Sat, Feb 16, 2019 21:57होमपेज › Marathwada › भूसंपादनाने आणली संपदा

भूसंपादनाने आणली संपदा

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 10:46PMबीड : बालाजी तोंडे

जिल्ह्यात 78.50 किलोमिटर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीला सरकारने बाजारभावाच्या चार पट अधिक मावेजा दिला. मावेजापोटी मिळालेल्या पैशाने बहुतांश शेतकर्‍यांनी दुसरीकडे जमिनी खरेदी केल्या. उरलेली रक्कम छोटा- मोठा उद्योग व्यवसाय उभारण्यात गुंतवली. मावेजाचा पैसा सत्कारणी लावणार्‍यांचे जीवनमान बदलून संपदा आली आहे. ज्यांनी भविष्याचा विचार न करता शौक साजरे करण्यात पैसा उधळला अशांचे  मात्र दिवाळे निघाले आहे. 

केंद्र आणि राज्यातील सरकारने भौतिक विकासावर भर दिला असून बीड जिल्ह्यात रेल्वेसह मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे होत आहेत. नव्याने मंजूर झालेल्या 7 राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्यात आले नाही. शासनाच्या आहे तेवढ्या जागेत रस्ते बांधणी करण्यात येत आहे. नगर-बीड-परळी रेल्वे आणि सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गासाठी 1862 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आलेे.

सरकारने बाजार भावाच्या चार पट अधिक मावेजा दिल्याने 126 गावांतील शेतकर्‍यांना तब्बल 993 कोटी रुपये इतका मावेजा मिळाला. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गासाठी 31 गावांतील 302 हेक्टर जमिनीचे 616 कोटी 53 लाख रुपये शेतकर्‍यांना मिळाले. समाधानकारक पैसेे आले, उर्वरित जमीन चार पदरी झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर आली. श्रमाला प्रतिष्ठा मानणार्‍या शेतकर्‍यांनी तेवढी शेती दुसरीकडे खरेदी करून उरलेल्या पैशात हॉटेल, ढाबा, किराणा दुकान सुरू केले. परिस्थितीची जाणीव ठेवून पैशाचा सदुपयोग करणार्‍या शेतकर्‍यांच्या जीवनात संपदा आली आहे. कळकटलेल्या आणि मळकटलेल्या कपड्यातील  शेतकर्‍यांची पोरं उद्योजक- व्यवसायिक म्हणून पुढे येत आहेत. तर ज्यांनी महागड्या गाड्या, बंगला आणि ऐशो आरामासाठी उधळपट्टी केली त्यांचे वर्ष दोन वर्षांतच दिवाळे निघाल्याचे चित्र आहे.

रेल्वेसाठी बीड जिल्ह्यातील 95 गावांतील 1538 हेक्टर 26 आर जमिनीचे भूसंपादन झाले. या संपादित जमिनीपोटी शेतकर्‍यांना 376 कोटी 89 लाख रुपयांचा मावेजा मिळाला. शहर परिसरातील शेतकर्‍यांना समाधानकारक मावेजा मिळाला असला तरी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना थोडा कमी मावेजा मिळाला आहे. 

कमी मावेजा असला तरी स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून पाहिलेले रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे. रेल्वे आल्यामुळे नवे-नवे उद्योग येतील, आपल्या मुलांच्या हाताला काम मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना आहे. बोटावर मोजण्या एवढ्या लोकांना अपवाद वगळला तर इतर शेतकरी रेल्वे येणार असल्यामुळे आनंदी आहेत.