Thu, Jul 18, 2019 15:03होमपेज › Marathwada › गेवराई तालुक्यात चौघांनी विष घेतले

गेवराई तालुक्यात चौघांनी विष घेतले

Published On: Aug 27 2018 1:15AM | Last Updated: Aug 26 2018 11:38PMगेवराई : प्रतिनिधी

तालुक्यात विविध ठिकाणी चौघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापैकी एका कर्जबाजारी शेतकर्‍याचा मृत्यू झाला असून तिघांवर गेवराई आणि बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
गेवराई तालुक्यातील खांडवी येथील शेतकरी विनायक विश्‍वनाथ नाईकवाडे या शेतकर्‍याने शनिवारी रात्री 9 वाजता शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून कर्जबारीपणातून त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दुसरी घटना तालुक्यातीलच धोंडराई येथे घडली असून अमोल चंद्रकांत गिरी यांनी  विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गिरी हे इसारवाडी (ता. पैठण) येथून धोंडराई येथे आले होते.

 विष प्राशन केल्यानंतर त्यांना गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथून बीडला दाखल करण्यात आले आहे. तर तिसरी घटना पांढरी येथे घडली असून अनिता राजेंद्र कांबळे (वय 27) यांनी विष प्राशन केले. त्यांनाही उपचारासाठी बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

चौथी घटना तालुक्यातील जातेगाव येथे घडली असून सविता बाबासाहेब चव्हाण (वय 26) यांनीही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.