Thu, Nov 15, 2018 13:44होमपेज › Marathwada › माजी आमदार कुंडलिकराव नागरे यांचे निधन

माजी आमदार कुंडलिकराव नागरे यांचे निधन

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 05 2018 12:55AMपरभणी : प्रतिनिधी

काँगे्स पक्षाने  कुंडलिकराव नागरे यांना 1999 साली जिंतूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. पहिल्यांदाच त्यांनी माजी आ. रामप्रसाद बोर्डीकरांच्या विरोधात निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यांच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी सत्तेत असतानाही शासनाला धारेवर धरले होते. यामुळे ते गोरगरिबांचे कैवारी म्हणून जिंतूर तालुक्यात परिचित होते. 

नागरे यांनी मतदारसंघातील मत्स्य व्यावसायिकांसाठी पूर्णा मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था येलदरीची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. यानंतर त्यांची बोर्डीकरांशी चांगलीच जवळीक निर्माण झाली. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांना जिल्हा बॅकेचे अध्यक्ष म्हणून निवडले. 

यात नागरे यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची 21 मे 2015 रोजी सूत्रे स्वीकारली. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी काँगे्रस पक्षाला सोडचिठ्ठी देत माजी आ. बोर्डीकरांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात मुंबई येथे जाहीर प्रवेश केला होता.   

तालुक्यातील प्रभावी व्यक्तिमत्त्व

तालुक्यातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि स्वच्छ प्रतिमेचे राजकारण करणारे राजकीय नेते म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात छबी होती. तालुक्यातील सावळी या छोट्या गावात जन्म घेतलेले नागरे  भ्रष्टाचाराबद्दल नेहमी आवाज उठवत असत. मुंबईला आपल्या व्यवसायासाठी स्थायिक झाल्यानंतर, जन्मगावाच्या ओढीने आपल्या तालुक्यासाठी काही तरी चांगले करायचे स्वप्न बघून शहरात भाविकांसाठी भव्य भागवत कथेचे आयोजन केले होते. 

कारकीर्द वाखाणण्याजोगी

नागरे यांनी मुंबईवरून आल्यानंतर कोणताही राजकीय वारसा नसताना 1998-99 मध्ये कॉँग्रेसकडून निवडणूक लढवून रामप्रसाद बोर्डीकर यांचा मोठ्या फरकाने पराभव करून विजय संपादन केला. यावेळी आ.विजय भांबळे यांचे वडील कॉँग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड. माणिकराव भांबळे यांचे सर्व वर्तमानपत्रात कॉँग्रेसकडून जाहीर झालेले तिकीट कापून नागरे यांनी तिकीट पक्के केले होते.