Fri, Feb 22, 2019 15:58होमपेज › Marathwada › दहा हजारांची लाच घेताना वन अधिकारी जाळ्यात

दहा हजारांची लाच घेताना वन अधिकारी जाळ्यात

Published On: Jan 06 2018 1:25AM | Last Updated: Jan 05 2018 9:37PM

बुकमार्क करा
बीड : प्रतिनिधी

दाखल झालेल्या एका गुन्ह्यातील दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी आणि सॉ मिल परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना वन विभागाच्या फिरत्या पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी मानसिंग भगवान राजपूत यांना बीड एसीबीने शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड एसीबीचे पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांच्या पथकाने केली. नवीन वर्षातील ही पहिलीच कारवाई आहे.

या प्रकरणातील तक्रारदारावर मागील वर्षी गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न दाखल करण्यासाठी आणि मादळमोही येथील सॉ मिलचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी वन विभागाच्या फिरत्या पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी मानसिंग राजपूत यांनी 15 हजार लाचेची मागणी केली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेस प्राप्त झाली होती.

बीड एसीबीने तक्रारीची खातरजमा केली असता राजपूतने मागणीपैकी 5 हजार रुपये 30 डिसेंबर रोजी स्वीकारल्याचे आणि उर्वरित रक्‍कम 5 जानेवारी स्वीकारण्याचे मान्य केल्याचे आढळून आले. त्यानुसार बीड एसीबीने शुक्रवारी सकाळी सापळा रचून बीड बसस्थानकासमोरील हॉटेल परिसरात मानसिंग राजपूत यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. राजपूत यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.