Thu, Feb 21, 2019 01:14होमपेज › Marathwada › परळीतील सोनहिवरा गावात बिबट्याची चाहूल 

परळीतील सोनहिवरा गावात बिबट्याची चाहूल 

Published On: Mar 24 2018 3:55PM | Last Updated: Mar 24 2018 3:55PMपरळी वैजनाथ : प्रतिनिधी 

तालुक्यातील सोनहिवरा गावात बिबट्याची चाहूल गावकऱ्यांना लागल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी सकाळी गावकऱ्यांना वाघसदृष्य प्राणी आढळला. सोनहिवरा गावाजवळील माळरानातून तो डोंगरदरीत गेल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान वनविभागाच्यावतीने याची शहानिशा शोध सुरू असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. 
       
याबाबत अधिक माहिती अशी की,  सोनहिवरा गावाच्या उत्तर दिशेला डोंगर आहे. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गावातील काही नागरिकांना वाघसदृष्य प्राणी दिसला. क्षणार्धात गावात वाघ किंवा बिबट्या आल्याची परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे नागरिकांत भिती निर्माण झाली.  

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाच्यावतीने तातडीने एक पथक शहानिशा व शोध घेण्यासाठी रवाना झाले. या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याबाबत  कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाहीत. पण गावातील लोकांना आढळून आलेला प्राणी बिबट्याच होता हे ठोस सांगता येत नाही. मात्र हा प्राणी तडस ही असण्याची शक्यता जास्त आहे. या भागात काही वर्षांपूर्वी बिबट्याचे वास्तव्य राहिल्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे नागरीकांना बिबट्या दिसलाही असू शकतो, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

नागरिकांनी घाबरू नये. ....
वन्यजीव हे नैसर्गिक समतोलासाठी आवश्यकच आहेत. या ठिकाणी अजून बिबट्याची चाहूल असण्याचे कोणतेच संकेत किंवा माग, खुणा असल्याचे आढळून आले नाही. कदाचित तडस प्राणी नागरिकांना दिसल्याची शक्यता अधिक आहे.  वनविभागाच्यावतीने सर्वतोपरी शोध घेण्यात येत आहे. नागरीकांना आढळून आलेल्या प्राण्याने कोणतेही नुकसान केलेले नाही. अथवा तसा प्रयत्न केल्याच्या काही खुणा नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बी. जी. कस्तुरे वनपाल, वनपरिक्षेत्र परळी वैजनाथ यांनी केले आहे.
 

Tag : Forest Department, Leopard, Beed District,  Parali,  Sonhivara Village