होमपेज › Marathwada › झेंडा प्रकरण; वीस जणांवर गुन्हा

झेंडा प्रकरण; वीस जणांवर गुन्हा

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 1:04AMगेवराई : प्रतिनिधी

चौकाचे विनापरवाना नामकरण करून लावलेला झेंडा काढल्याच्या कारणावरून तालुक्यातील मारफळा येथे शनिवारी दोन गट समोरासमोर भिडले होते, दरम्यान जबर हाणामारी आणि झालेल्या दगडफेकीत पंधराहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते, तसेच एका पोलिस व्हॅनसह दोन मोटारसायकलची जमावांकडून तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी अंदाजे वीस ते पंचवीस जणांवर शनिवारी रात्री उशिरा तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेच्या दुसर्‍या दिवशी ही याठिकाणी खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात होता.

गेवराई तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग 222 वरील मारफाळा फाटा येथे गोरसेनेच्या कार्यकर्ते तसेच लोणावळा येथील काही ग्रामस्थांनी रस्त्यावरच गोरसेनेचा झेंडा लावून चौकाची स्थापना केली. वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने मारफळा ग्रामस्थांनी तलवाडा पोलिस ठाण्यात तक्रार देऊन पोलिसांच्या मदतीने झेंडा त्या ठिकाणाहून काढून घेतला, मात्र शनिवारी सकाळी याठिकाणी झेंडा काढल्याच्या कारणावरून लोणावळा ग्रामस्थ व गोरसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारफळा येथील काही व्यक्तींना मारहाण केल्यानंतर प्रत्त्युत्तर दाखल दोन्ही गट फ्री स्टाईल भिडून तुफान दगडफेक झाली होती. यामध्ये जवळपास पंधराहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते, तसेच यामध्ये एका पोलिस व्हॅनसह दोन मोटारसायकलची देखील जमावांनी मोडतोड केली होती. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एम. एन. शेळके यांनी अंदाजे वीस ते पंचवीस जणांवर गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.