Mon, Jun 24, 2019 21:07होमपेज › Marathwada › आर्वीत पाच बालके कुपोषित

आर्वीत पाच बालके कुपोषित

Published On: Feb 20 2018 1:53AM | Last Updated: Feb 20 2018 1:53AMआर्वी  : प्रतिनिधी

महिला व बालकल्याण विभागामार्फत राज्यात कुपोषण मुक्त बालकांसाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे.  परंतु आर्वीसारख्या गावात आरोग्य विभागाला पाच कुपोषित बालके आढळून आल्याने या योजनांचा कितपत उपयोग होतो, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. राज्य सरकारने ग्रामीण भागातील कुपोषित बालकांवर उपचार व्हावेत, यासाठी शून्य ते सहा वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता.

या तपासणीत कुपोषित सापडलेल्या बालकांवर उपचार करून त्यांना कुपोषणमुक्त करण्यासाठी ग्राम बालविकास केंद्रांची स्थापना करण्यात आली. कुपोषित बालकांना पोषण आहार आणि पुरक औषधे या बालविकास केंद्रांच्या ठिकाणी मोफत देण्यात येतात. कुपोषित बालकांसोबत त्यांच्या मातांनादेखील या बालविकास केंद्राच्या ठिकाणी पोषण आहार वाटप केला जातो. मागील काही वर्षांपासून या बाल विकास केंद्रांचा फायदा कुपोषित बालकांना झाला असून, जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण बर्‍याच प्रमाणात कमी झाले आहे.

  आर्वीत आरोग्य विभागाला  1 सॅम (तीव्र कुपोषित)  4 मॅम (मध्यम कुपोषित) बालके कुपोषित आढळली आहेत. महिला व बालकल्याण विभागामार्फत गाव पातळीवर ग्रामविकास केंद्रातून या कुपोषित बालकांना पोषण आहार आणि औषधांचे वाटप करण्यात येते असतो, मात्र विभागाकडे सध्या निधीच उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत. अंगणवाडी सेविकांवर ही बालविकास केंद्र चालवण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली  आहे.

चार वर्षांपासून निधीच नाही

एका कुपोषित बालकासाठी महिन्याला एक हजार रुपये आहार आणि प्रशासकीय खर्चापोटी देण्यात येतात.  राज्य सरकारकडून चार वर्षांपासून ग्राम बालविकास केंद्रासाठीचा निधीच उपलब्ध झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
 

कुपोषित बालकासाठी आरोग्य विभागामार्फत मोफत उपचार पद्धती अवलंबली जाते . संबंधीत पालकाच्या संमतीने जिल्हा रुग्णालयात कुपोषित बालकावर 21 दिवस उपचार केले जात असून याबाबत पालकात जागरूकताही महत्त्वाची आहे.  यासाठी ते उत्साही नसतात यामुळे कुपोषित बालकांना अडचणीला सामोरे जावे लागते.

-डॉ. विकास आठवले, खालापुरी प्राथमिक आरोग्य केंद्र.