Sat, Apr 20, 2019 09:55होमपेज › Marathwada › कापसाच्या गोडाऊनला भीषण आग

कापसाच्या गोडाऊनला भीषण आग

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:50PMपरभणी : प्रतिनिधी

कापसाच्या गाठी असणार्‍या गोडाऊनला आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची घटना  रविवारी (दि.22) दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. 

पाथरी रोडवरील डेंटल कॉलेजसमोर हरिश कत्रूवार यांचे कत्रूवार वेअर हाऊस आहे.  दुपारी आग लागल्याची माहिती कत्रूवार यांना मिळाली. यावर त्यांनी त्वरित अग्निशमन विभागाच्या पथकास पाचारण केले. दीपक कानवटे, सचिन जाधव, मदन जाधव, शंकर कुटे, चालक मौलाना यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले. गोडाऊनमध्ये कापसाच्या गाठी असल्याने आग वाढतच गेली. 

आगीचे लोळ बाहेर पडत होते. त्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी तेथे धाव घेतली. यानंतर पाथरी, मानवत येथील अग्निशमन विभागाच्या गाड्या बोलावून आग विझवण्याचे कार्य सुरू करण्यातआले. जवळपास दोन ते तीन तासानंतरही आग विझवण्याचे काम रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते.  आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. गोडाऊनच्या परिसरात ही आग फैलावल्याने आजूबाजूचे गवतही जळून खाक झाले. 

रविवारी रात्री उशिरापर्यंत ही आग विझवण्याचे काम सुरू होते. कत्रूवार यांची गंगाखेड रोडवरही जिनिंग प्रेसिंग असून तेथेही काही दिवसांपूर्वी आग लागली होती. आगीचे कारण समजू शकले नाही, परंतु आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी गाड्यांची आवश्यकता आहे. गाठी, सरकी पेंड आगीत जाळून खाक झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज जिनिंगचे सुरक्षा रक्षक रामभाऊ सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.