Sun, May 19, 2019 14:54
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › नऊ तासांनंतरही आगीचे लोळ होते कायम; कुर्ला रोडवरील घटना

कापसाच्या गोदामाला आग

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 22 2018 11:11PMबीड : प्रतिनिधी

शहरातील कुर्ला रोडवर बाजार समितीच्या भागात असणार्‍या एका शासकीय गोदामाला रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण आग लागली.  आग विझविण्यास तब्बल आठ तासांहून अधिक कालावधी लागला. रविवारी दुपारपर्यंत अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरू होते. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. एवढी मोठी आग कशामुळे लागली होती याचे कारण समजू शकलेले नाही.

बीड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गोडाऊन आहे. राजू संचेती यांनी जानेवारी 2018 मध्ये हे गोडाऊन ताब्यात घेऊन तेथील एका गोडाऊनमध्ये एका इंडस्ट्रीजच्या 1932 कापसाच्या गाठी  ठेवलेल्या होत्या. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्या गोडाऊनला अचानक आग लागली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्या परिसरात पेट्रोलिंगसाठी गेले असता आगेचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या बंबाना पाचारण करण्यात आले. रविवारी सकाळर्पंत 20 पेक्षा अधिक बंबांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र दुपारी बारापर्यंत आग अटोक्यात आलेली नव्हती. तब्बल 9 तासांपासून आगीचे लोळ गोडाऊनमधून बाहेर पडत होते.यात शेकडो गाठींना आग लागून मोठे नुकसान झाले आहे.

आग लावली की लागली?

गोडाऊनमध्ये बंद असलेल्या कापसाच्याच गाठीला नेकमी आग कशी लागली यावर संशय निर्माण झाला आहे. कोट्यावधी रुपयांच्या कापसाच्या गाठींना आग लावली की लागली? याबाबत उलटसुलट चर्चा शहरातील नागरिकांतून केली जात होती.