होमपेज › Marathwada › हिंगोलीत कापड दुकानाला आग, कोट्यवधीचा माल खाक 

हिंगोलीत कापड दुकानाला आग, कोट्यवधीचा माल खाक 

Published On: May 14 2018 2:00PM | Last Updated: May 14 2018 2:00PMहिंगोली : पुढारी ऑनलाईन 

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकात असलेल्या कस्तूरी कापड दुकानाला रविवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत अडीच कोटीच्या वर नुकसान झाले असून, आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. झालेल्या नुकसानीच्या पचंनाम्याचे काम सुरु आहे. शहरातील प्रदिप दोडल यांचे  दोन मजली कस्तूरी कापड दुकान अत्यंत जुने असून, या दुकानात फॅन्सी, रेडिमेंट ड्रेससह लग्नाचे बस्ते घेण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने असतात. अत्यंत जुने व विश्वासू कापड दुकान म्हणून याची सर्वदूर ओळख आहे. लग्नसराईमुळे नवनवीन फॅन्सी ड्रेस, साड्या, कापड मोठ्या प्रमाणात दुकानात होते. रविवारी मध्यरात्री दिडनंतर दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच मालकासह परिवारातील सर्व मंडळी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनाही या संबंधिची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे नगर पालिकेकडे एक अग्निशमन दलाचे वाहन असले तरी ते नादुरूस्त अवस्थेत असल्याने हे अग्निशमन दल घटनास्थळी पोहचूनही आग विझविण्यात यश येत नव्हते. दरम्यान, कळमनुरी येथील अग्निशमन दलाच्या पथकास पाचारण करण्यात आले. हे पथक काही वेळात घटनास्थळी पोहचले. तसेच शहरातील काही कंत्राटदार मंडळीचे दहा ते पंधरा टॅंकर घटनास्थळी पोहचल्याने आगीवर नियंत्रण करता आले.

जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, पोनि अशोक मैराळ सह नगर पालिका, पोलीस विभागाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी धावले. सकाळपर्यंत आग नियंत्रणात आली. विशेष म्हणजे त्याला लागूनच रेणुकादास दोडल यांचे भव्य कापड दुकान असून, अग्निशमन दलाच्या पथकासह पोलीस कर्मचारी, न.प.कर्मचारी व शहरातील मंडळींनी बाजुच्या दुकानातील साहित्य काढण्यास मदत केली. बाजुच्या दुकानचे नाममात्र नुकसान झाले. यासाठी सर्वांचे प्रयत्न उपयुक्त ठरले.

कापड दुकानाला लागलेल्या भिषण आगीत अडीच ते तीन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम उशीरा सुरू केले असून, आगीचे स्वरूप इतके भिषण होते की त्या दुकानातून संपूर्ण साहित्य जळून खाक तर झालेच मात्र आता त्या दुकानाच्या इमारतीला तडे गेल्याने दुकान मालकास नव्याने इमारत बांधकाम करण्याची वेळ येणार असल्याचे तज्ञांकडून बोलले जात आहे.