Thu, Sep 19, 2019 03:28होमपेज › Marathwada › दुग्ध व्यवसायातून आर्थिक सुबत्ता 

दुग्ध व्यवसायातून आर्थिक सुबत्ता 

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 8:58PMअंबाजोगाई  : रवी मठपती

अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील शेतकरी संजय हरिश्चंद्र डिवरे यांनी दुग्ध व्यवसायातून आर्थिक सुबत्ता मिळवली आहे. शेतकरी डिवरे यांना दूध विक्रीतून दररोज ताजा पैसा मिळतो आहे. दूध विक्रीतून  वर्षाकाठी तीन लाख रुपये तर शेण खत विक्रीतून एक ते सव्वालाख रुपये डिवरे कमावतात. ग्रामीण भागात राहून लाखो रुपयांचा व्यवसाय शेतकरी करू शकतात याचे उत्तम उदाहरण डिवरेंचे सांगता येईल. 

शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा व्यवसाय हे गणित डिवरे यांनी यशस्वीरित्या जमवले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील शेतकरी संजय हरिश्चंद्र डिवरे यांचा दुधाचा व्यवसाय वडिलोपाजित आहे. सन 1978 पासून दुधाचा व्यवसाय एका म्हशीपासून वडिलांनी सुरू केला. आजतागायत हा  सुरूच आहे. सध्या लहान मोठ्या अशा एकूण 26 म्हशी आहेत. दुधाच्या व्यवसायास जिवंत व्यवसाय म्हटले जाते, कारण तो बारा महिने चालतो.

डिवरे यांच्याकडे जाफराबादी जातीच्या 26 म्हशी आहेत. त्यात काही वगारी आहेत. पाच म्हशी परभणीहून खरेदी केल्या होत्या. उर्वरित म्हशी घरच्याच आहेत. रेतनासाठी रेडा सांभाळण्यात आला आहे. जाफराबादी म्हशीच्या किंमती बाजारात  एक लाखापासून दीड लाख रुपयांपर्यंत आहेत. डिवरे यांच्याकडील जाफराबादी म्हैस 12 ते 15 लिटर दूध देते. सध्या पाच म्हशी दूध देतात. काही गाभण आहेत. दररोजचे साठ ते पासष्ठ लिटर दूध जमा होते. दूध डेअरीवर एकही थेंब विकत नाहीत. शेतकरी संजय डिवरे पहाटे उठून अंबाजोगाई शहर गाठतात. सर्व दूध घरोघरी जाऊन पन्नास रुपये प्रती लिटरप्रमाणे पोहोचवतात. जाफराबादी जातीच्या म्हशी तशा आरोग्याने धडधाकट असतात. समान्य आजारास बळी पडत नाहीत. असे डिवरे यांनी सांगितले.