होमपेज › Marathwada › गारपीट नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला मिळाले 4 कोटी

गारपीट नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला मिळाले 4 कोटी

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 13 2018 1:42AMबीड : प्रतिनिधी

जिल्ह्यातील गेवराई, शिरूर, माजलगाव व केज या चार तालुक्यांतील काही भागात 11 फेब्रुवारी रोजी गारपीट झाली होती. प्रशासनाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन केलेल्या पंचनाम्यानुसार अंतिम अहवाल पाठवत 4 हजार 402 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे नमूद करण्यात आले होते. या अहवालानुसार गारपीट नुकसान भरपाईपोटी म्हणून जिल्ह्यास 4 कोटी 7 लाख रुपये निधी प्राप्‍त झाला आहे. तालुकास्तरावरून त्याचे वितरण करणे सुरू झाले आहे. 

प्रशासनाने जेवढ्या रकमेची मागणी केली होती तेवढ्या निधीची पूर्तता प्रथमतःच करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रारपीटग्रस्त शेेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त क्षेत्राचा अंतीम अहवाल शासनाला पाठविला होता. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधीकरणच्या नियमानुसार जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी 6 हजार 800 रुपये प्रमाणे एकूण 2 कोटी 1 लाख 82 हजार 264, बागायत क्षेत्रासाठी हेक्टरी 13 हजार 500 रुपये प्रमाणे एकूण 1 कोटी 58 लाख 81 हजार 940 रुपये तर फळपिक नुकसानीपोटी हेक्टरी 18 हजार रुपयांप्रमाणे एकूण 46 लाख 53 हजार 180 अशा एकूण 4 कोटी 7 लाख 17 हजार 384 रुपये निधी मिळाला आहे. शुक्रवारी 9 मार्च रोजी जिल्ह्यास 4 कोटी रुपये निधी वितरीत करण्याचा संदेश प्राप्‍त झाला.

त्युसार सदर आर्थिक मदत शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झाली. नुकसानग्रस्त क्षेत्रामध्ये सर्वाधिक गेवराई तालुक्यातील 3 हजार 854.25 हेक्टर, शिरूर तालुक्यातील 399.69 हेक्टर, माजलगाव तालुक्यातील 88.99 हेक्टर तर केज तालुक्यातील 60 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. नुकसानग्रस्त एकूण क्षेत्रामध्ये 2 हजार 968 इतके जिरायत क्षेत्र, 1 हजार 176.4 हेक्टर इतके बागायत क्षेत्र तर 258.51 हेक्टर इतक्या फळपिक क्षेत्राचा समावेश आहे. 

सर्वाधिक मदत गेवराई तालुक्यास मिळाली आहे. दरम्यान, प्राथमिक अहवालात बीड तालुक्यातही पिकांचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले होते, मात्र बीड तालुक्यात नुकसानच झाले नसून केज तालुक्याचा नुकसानीमध्ये नव्याने समावेश करण्यात आला होता.  त्यानुसार केज तालुक्यास निधी मिळाला आहे.