Tue, Apr 23, 2019 14:13होमपेज › Marathwada › अखेर त्या चिमुकलीस आई-वडिलांनी स्वीकारले

अखेर त्या चिमुकलीस आई-वडिलांनी स्वीकारले

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 9:16PMबीड : प्रतिनिधी

बाळ बदलण्यात आले आहे, या संशयातून माता-पित्यांनी स्वतःच्या मुलीस नाकारले होते. समाजसेविकांनी या दाम्पत्याचे सतत समुपदेशन केल्याने त्यांच्या प्रयत्नाला मंगळवारी यश आले. त्या चिमुकलीच्या माता-पित्यांनी स्वीकार केला. औरंगाबादेतील सिडको एन 4 मधील भारतीय समाज सेवासंघाच्या अनिकेतन अनाथालयात मंगळवारी सकाळी 11 वाजता हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील छायाबाई राजू थिटे यांची शासकीय रुग्णालयात 11 मे रोजी प्रसूती झाली. त्यांना मुलगी झाली असली तरी डॉक्टर आणि परिचारिकांच्या गोंधळामुळे नोंदवहीत मुलगा झाल्याचे नोंदवले गेले, दरम्यान मुलीची प्रकृती खालावल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयाने दाम्पत्याकडे मुलीला सोपवले असता मुला ऐवजी मुलगी दिली असा आरोप या दाम्पत्यासह नातेवाइकांनी केला. दहा दिवस हा घोळ सुरूच होता. पोलिसांनी अखेर डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. अहवालात मुलगी या दाम्पत्याची  असल्याचे सिद्ध झाल्याने मुलीला आई-वडिलांकडे सोपवले. मात्र, पुन्हा अवघ्या 22 तासांतच थिटे दाम्पत्याने विचार बदलला आणि मुलगी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर तिला औरंगाबादेतील भारतीय समाज सेवा संघाच्या अनिकेतन या अनाथालयात दाखल कऱण्यात आले.

डीएनए अहवाल सांगितला समजून

डीएनए रिपोर्ट काय असतो हे माहीत नसल्याने आई-वडील असतानाही त्या चिमुकलीवर अनाथालयात राहण्याची वेळ आली होती.  तर डीएनए अहवाल मिळण्यास दोन ते चार वर्षे लागतात, असे काही लोकांनी या दाम्पत्यास सांगितले होते. त्यामुळे हे दाम्पत्य गोंधळून गेले होते. शासनाला विनंती करून डीएनए अहवाल शक्य तितक्या लवकर देण्याची विनंती करण्यात आल्यामुळे अहवाल तातडीने मिळाल्याचे या दाम्पत्यास पटवून देण्यात आल्याने त्यांचे मनपरिवर्तन झाले.