होमपेज › Marathwada › पंधरा पेयजल योजनांना मुहूर्त

पंधरा पेयजल योजनांना मुहूर्त

Published On: Apr 28 2018 1:44AM | Last Updated: Apr 27 2018 11:35PMबीड : दिनेश गुळवे

ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या टप्पा क्र. एक मध्ये 64 योजनांना मंजुरी मिळाली आहे. यातील 15 कामांना मुहूर्त मिळाला असून त्याच्या निविदाही निघाल्या आहेत. पाणीपुरवठ्याच्या कामात बरेच पाणी मुरत असले तरी या कामांमुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर होत असल्याने लोकप्रतिनिधी या योजनेतून काम व्हावे, यासाठी जोरदार फिल्डिंग लावत आहेत. आता टप्पा क्र. दोनसाठी जवळपास 114 गावांचे प्रस्ताव आले आहेत.

ग्रामीण भागात गाव, वाडी-वस्त्यांवर पाण्याची सोय नसल्याने दर उन्हाळ्यात पाणीटंचाई ग्रामस्थांच्या पाचविला पुजलेली असते. पाणीपुरवठ्यासाठी जलस्वराज्य, निर्मल भारत अशा अनेक योजना राबविल्या असल्या तरी अद्यापही अनेक गावात पाणीटंचाई जैसेथेच आहे.  काही ठिकाणी या योजनांमध्ये अपहार झाल्याने संबंधित पाणीपुरवठा समित्यांच्या पदाधिकार्‍यांच्या सातबारावर बोजाही चढविण्यात आला आहे. 

या  योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात आपल्या मतदारसंघातील गावांची निवड व्हावी व तेथील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी आमदार जोरदार प्रयत्न करीत आहेत.  मंत्रालयातून पाणीपुरवठा विभागात 114 प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.  

पाणीपुरवठा योजनेत काही ठिकाणी पाणीच मुरण्याचे काम होत असल्याने आता या योजनांना मंत्रालयातून मंजुरी दिली जात आहे. या योजनेत भ्रष्टाचार होऊ नये व ग्रामीण भागात पाणीपुरवठा योग्य पद्धतीने व्हावा, यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना आता राबविण्यात येत आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील 64 गावांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरी दिलेल्या गावांपैकी 15 गावांच्या निविदा निघाल्या आहेत. त्यामुळे येथे आता लवकरच काम सुरू होणार आहे.