Wed, Jul 17, 2019 12:18होमपेज › Marathwada › स्त्री रूग्णालय नवीन बांधकामास पशुसंवर्धन इमारतीचा अडथळा

स्त्री रूग्णालय नवीन बांधकामास पशुसंवर्धन इमारतीचा अडथळा

Published On: Aug 27 2018 1:15AM | Last Updated: Aug 27 2018 1:15AMपरभणी : नरहरी चौधरी

जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधकामासाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून येत्या 24 महिन्यांत बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश 8 ऑगस्ट रोजी मिळाले आहेत, पण ज्या ठिकाणी बांधकाम करावयाचे आहे तेथे सध्या कार्यरत पशुसंवर्धनचे कार्यालय पाडल्याशिवाय नवीन बांधकाम अशक्य आहे. यासाठी ते पाडण्याकरिता नेमकी परवानगी कधी मिळणार? याकडे लक्ष लागले आहे. 

सध्या ज्या जागेत हे रुग्णालय चालत आहे तेथे प्रसूतीकरिता आलेल्या महिला रुग्णांकरिता जागा अपुरी पडत असल्याने संपूर्ण सुविधा पुरवणे रुग्णालय प्रशासनास कठीण बनले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री रुग्णालयाकरिता मागील अनेक वर्षांपूर्वीच दर्गाह रोड परिसरात अडीच एकर जागा उपलब्ध करून तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी भूमिपूजन केले होते. शनिवार बाजार परिसरात एक इमारत उभारून तेथे हे रुग्णालय जाणार होते, पण तेथे नेत्र रुग्णालय उभारले. सध्या जुन्या जीर्ण झालेल्या कक्षात हे 60 खाटांचे रुग्णालय चालत आहे. याला स्वतंत्र दर्जा मिळाल्याने 7 वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक झाली. आज तेथे नेहमी गळती लागत असून छताचा मलबाही अनेक वेळा कोसळला. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी नवीन इमारतीसाठी प्रयत्न सुरू केले. भरपावसात त्यांनी याबाबतची पाहणी करून योग्य ते आदेश दिले आहेत, पण जेथे नवीन बांधकाम करावयाचे आहे तेथे सध्या पशुसंवर्धन विभाग कार्यालयाची इमारत असल्याने ती पाडल्याशिवाय हे बांधकाम करणे अशक्य आहे. ती इमारत पाडण्याकरिता लेखी आदेश केव्हा मिळतात यावर सर्व बाबी अवलंबून आहेत.