होमपेज › Marathwada › निरुपयोगी औषधांमुळे आजाराची भीती

निरुपयोगी औषधांमुळे आजाराची भीती

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 1:18AMसेनगाव : प्रतिनिधी

शहरातील विविध खासगी दवाखान्यात रुग्णांवर औषधोपचारानंतर शिल्लक राहणार्‍या निरुपयोगी औषधांची विल्हेवाट योग्य होत नाही. शहर परिसरात व नगर पंचायतीच्या घंटागाडीत वापरलेले औषधी साहित्य सर्रास टाकण्यात येत आहे. निरुपयोगी औषधांमुळे  नागरिक व जनावरांना संसर्गजन्य आजारांची लागण होण्याची दाट शक्यता आहे. दररोज निरुपयोगी औषध नेणारे वाहन येत नसल्यामुळे हा प्रकार घडू लागला आहे.

शहरात विविध खासगी दवाखाने आहेत. तालुका ठिकाणी शहरासह परिसरातील विविध आजारांचे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. रुग्णांवर औषधोपचारादरम्यान इंजेक्शन, सलाईन, औषधी गोळ्या दिल्या जातात.  उपचारानंतर शिल्लक राहिलेल्या निरुपयोगी औषधांच्या विल्हेवाटीची जबाबदारी संबंधित दवाखान्यावर राहते. संबंधित साहित्य दवाखान्यात जमविले जाते. प्रदूषण मंडळाकडून कंत्राट पद्धतीवर एजन्सीला निरुपयोगी औषध दररोज नियमित वाहनाद्वारे जमवून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची प्रमुख जबाबदारी दिली जाते. मात्र नियमित दरोज शहरात वाहन येत नाही. परिणामी वापरलेले औषधी साहित्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न खासगी दवाखान्यासमोर उभा राहतो.

निरुपयोगी औषध नेणार्‍या वाहनाला खासगी दवाखान्यांकडून प्रतिमहिना ठराविक शुल्क दिल्या जाते. नियमित सुविधा न पुरविल्यामुळे काही डॉक्टरांनी निरुपयोगी औषध देण्यापेक्षा स्वतःच विल्हेवाट लावण्यावर भर दिला आहे. त्यातच संंबंधित कंत्राटदार व खासगी दवाखाने यांच्यात शुल्क आकारण्यावरून मतभेद आहेत. दरम्यान नियमानुसार वापरलेल्या औषधी साहित्याची परिसरातील जमिनीत खड्डा करून विल्हेवाट लावणे, औषधाचे डब्बे, पन्न्या जाळून टाकणे, उघड्यावर न टाकणे, नगर पंचायतीच्या घंटागाडीत न टाकणे यासह विविध असलेल्या अटींचा वापर होत नाही.

उघड्यावर वापरलेल्या औषधी साहित्यापासून जनावरे व नागरिकांना संसर्गजन्य आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते. शहर परिसरात वापरलेली औषधी साहित्य उघड्यावर तर नगर पंचायतीच्या घंटागाडीत टाकण्यात येऊ लागला आहे. सदरील घंटागाडी गायरानात घनकचरा नेऊन टाकते विशेष म्हणजे शहरातून कचरा घेऊन जाणार्‍या घंटागाड्यावर कोणतेही झाकून नेण्याची व्यवस्था नाही. वाहनातून बर्‍याचदा कचरा उडतो. कचर्‍यासोबत निरुपयोगी औषध जाऊ लागला आहे. या गायरान परिसरात जनावराचा वावर राहतो शिवय नागरिकांची ये-जा राहते. उघड्यावर पडणार्‍या वापरलेल्या औषधी साहित्य नागरिक व जनावरांच्या आरोगयासाठी घातक ठरू शकण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान शहरातील काही खासगी डॉक्टरांनी नियमित दररोज निरुपयोगी औषध नेणारे वाहन आल्यास वापरलेल्या औषधी साहित्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र आरोग्य विभाग उघड्यावर पडणार्‍या औषधी साहित्याकडे दुर्लक्ष का करते हा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.