Wed, Feb 20, 2019 01:14होमपेज › Marathwada › आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

शेतीच्या वादातून एकाचा भरदिवसा खून

Published On: Jun 13 2018 8:13PM | Last Updated: Jun 13 2018 8:13PMहिंगोली : प्रतिनिधी

शेतीच्या वादातून सवड येथील शेतकर्‍यावर एकाने भर दिवसा हिंगोली तहसील कार्यालयाच्या आवारात कत्तीचे वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या हल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नारायण राऊत (वय 50, रा.सवड ता.हिंगोली) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आज, बुधवार (13 जून)  दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मयत शेतकरी जीवाच्या आकांताने मदतीची याचना करीत असतांना कोणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नारायण सिताराम राऊत याचा रंगनाथ मोडे (वय 22, रा. पहेणी ता.हिंगोली)  यांच्याशी शेतीचा वाद होता. आज, बुधवार (दि.13 जून) हिंगोली येथील तहसील कार्यालयात याबाबत सुनावणी होती. यासुनावणीसाठी मोडे आणि राऊत तहसील कार्यालयाच्या आवारात हजर होते. याचवेळी रंगनाथ मोडे याने नारायण राऊत यांच्यावर कत्तीने हल्ला करत त्यांच्यावर सपासप वार केले. यावेळी राऊत हे मदतीसाठी थेट तहसील कार्यालयात घुसले. मात्र या हल्यात राऊत यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात ते खाली कोसळले. 

तहसीलच्या कर्मचार्‍यांनी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांना याघटनेची माहिती देताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नारायण राऊत यांना शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र राऊत यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची उशिरापर्यंत हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र आरोपी रंगनाथ मोडे हा स्वतःहून हिंगोली पोलिसांसमोर हजर झाला.