Sun, May 19, 2019 14:29
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › कर्जमाफ नंतरही शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच

कर्जमाफ नंतरही शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच

Published On: Feb 15 2018 2:28AM | Last Updated: Feb 15 2018 2:01AMगेवराई : विनोद नरसाळे

निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला येऊन आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच मागील तीन-चार वर्षे पावसाचे प्रमाण खूपच कमी होऊन मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट ओढावले होते.  शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आहे. यामध्ये बहुतांश शेतकर्‍यांचे कर्ज माफीचा घोळ अजूनही कायमच आहे. गेवराई तालुक्यात 2017 या वर्षात 32 तर चालू वर्षात 2 शेतकर्‍यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून मृत्यूला कवटाळत आत्महत्या केल्या आहेत.

राज्यातील शेतकरी आत्महत्या हा नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. आघाडी सरकारच्या काळातही शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त होते. नंतर भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावरही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रकार थांबलेले नाही. त्यातच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आत्महत्याचे सत्र वाढतच गेले. त्यामुळे शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी या विषयांवरून गत अधिवेशन चांगलेच गाजले. 

यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानुसार भाजप सरकारने देखील सुरुवातीला सरसकट कर्जमाफीची घोषणा केली, मात्र या कर्जमाफीमध्ये किचकट अटीने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचे चित्र आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण अधिक राहिले, पीक परिस्थिती चांगली दिसून आली, मात्र यानंतर शेंदरी बोंडअळीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले. परिणामी शेतकरी पुन्हा खचला. यामुळे की काय तालुक्यात सरत्या वर्षात 32 शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. 

शेतकर्‍यांसाठी विविध योजना आणल्याचा दावा करणार्‍या भाजप सरकारच्या कार्यकाळात 2015 मध्ये गेवराई तालुक्यात 51  व 2016 मध्ये  41 तर 2017 या वर्षांत 32 तर चालू वर्षात देखील 2 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती एका अहवालामधून समोर आली आहे. नापिकी, शेतमालाला न मिळणारा भाव, दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा विविध कारणांमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच राहिल्याचे चित्र आहे. नापिकी, कर्जाचा डोंगर यासोबतच दुष्काळ, अतिवृष्टी अशा विविध कारणांमुळे शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे यामधून स्पष्ट होत आहे. या शेतकर्‍यांच्या कुटुंबांना शासनाकडून मदत मिळाली असली तरी ही मदत अतिशय तुटपुंजी असून घरातील कर्ताच गेल्याने हे कुटुंब उघड्यावर पडल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे. दरम्यान मागील दोन महिन्यांपूर्वी शासनाने या कुटुंबासाठी दारोदारी जात सर्वे करून त्यांना विविध योजनेअंतर्गत मिशन दिलासा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांना मिशन दिलासा मधून खरोखरच लाभ मिळणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.