Thu, Apr 25, 2019 05:53होमपेज › Marathwada › शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा 

शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा 

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 10 2018 12:43AMपरभणी : प्रतिनिधी

जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाने ताण दिल्याने खरिपातील सोयाबीन, मूग पिकांचे नुकसान झाले. पीकविमा नुकसानभरपाई देण्यासाठी मात्र एका खासगी विमा कंपनीने शेतकर्‍यांची थट्टा केली आहे. अनेक शेतकर्‍यांना अत्यल्प म्हणजे 156 रुपये विमा दिला.सोयाबीन विमा भरणार्‍या 2 लाख 79 हजार शेतकर्‍यांपैकी केवळ 48 हजार जणांना विमा दिला. यात सुमारे 2 लाख 30 हजार शेतकर्‍यांना छदामही दिला नाही. अशीच स्थिती मुगाची केली आहे. सदरील विमा कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा. शेतकर्‍यांना संपूर्ण 40 हजाराची नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकपाचे नेते कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्यात आला.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी 800 रुपये विम्याचा प्रीमियम भरावा लागला. राज्य  शासन 3200  तर केंद्र शासन 3200 रुपयांचा सहभाग देतात. यातून विमा कंपनीला हेक्टरी 7 हजार 200 रुपये विमा मिळतो. यात सोयाबीन पिकासाठी जिल्ह्यातील खरीप हंगाम 2017 मध्ये 2 लाख 79 हजार शेतकर्‍यांनी 19 कोटी 27 लाख 36 हजार रुपयांचा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरला. राज्याने 77 कोटी आणि केंद्राने 77 कोटी विमा कंपनीस दिले. कंपनीस सोयाबीन विमा हप्ता म्हणून 173 कोटी 46 लाख मिळाले यातून कंपनीने केवळ 30 कोटी 82 लाख रुपये विम्यापोटी तेही केवळ 48 हजार शेतकर्‍यांना अदा क रत आहे.

शासनाच्या 20 जूनच्या निर्णयानुसार प्रत्येक गाव व शेतकरीनिहाय उंबरठा उत्पन्नाच्या झालेली घट लक्षात घेता नुकसान प्रमाणात 40 हजार जोखीम हिश्श्याची भरपाई शेतकर्‍यांना अदा करणे आवश्यक आहे. पण कंपनीने शासनाशी केलेल्या कराराचा भंग केला आहे.  एकीकडे  शासन 50 टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी असल्याचे व खरीपांचे 50 टक्क्यापेक्षा जास्त नुकसानीची वस्तुस्थिती पुढे आली आहे. पण कंपनीने शेतकर्‍यांंकडून वसूल केलेल्या रकमेच्या केवळ 15 ते 17 टक्के परतावा करत शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. मोठ्या बिकट परिस्थितीत दोन-दोन दिवस रांगेत उभे राहून प्रसंगी पोलिसांच्या काठ्या झेलत विमा शेतकर्‍यांनी भरला. पाथरी पोलिसांत उमरा गावातील शेतकरी नवनाथ कोल्हे यांची रीतसर तक्रार आहे.

Tags : Marathwada, Farmers, struggle, committees, protest