Sat, Aug 17, 2019 16:12होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांना अद्याप पीकविम्याचा छदामही नाही

शेतकर्‍यांना अद्याप पीकविम्याचा छदामही नाही

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 11:22PMलिमला : शिवबाबा शिंदे 

पूर्णा तालुक्यातील लिमला महसूल मंडळातील गावांना  यावर्षी खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा जोरदार फटका बसला. सोयाबीन  पीक बहरण्याच्या स्थितीत असताना पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. 

ऐन पावसाळ्यात वैशाख वनवा भडकला,  जमिनी भेगाळल्या, सोयाबीन पीक जागेवरच करपल्याने   शेतात केलेला खर्चदेखील निघाला नाही.  पीकविमा कंपनीसह महसूल प्रशासनाने पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले आसले तरी शेतकर्‍यांच्या हाती  मात्र अजूनपर्यंत छदामही पडला नाही. त्यामुळे बळीराजा  हवालदिल झाला आहे.  

यावर्षी खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेती पिकांना मोठ्या प्रमाणात बसला. सोयाबीन  बहरण्याच्या स्थितीत आसताना पावसाने हुलकावणी दिल्याने  हातातोंडाशी आलेला घास हिरावला. अत्यल्प पावसामुळे पीक जागेवरच करपले. शेतकर्‍यांनी पोटाला चिमटा घेऊन  पिकांना विमा संरक्षण दिले  मात्र विमा कंपनीने  विम्याचा परतावा  अद्यापपर्यंत दिलेला नाही. त्यामुळे  शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 

दिवसेंदिवस शेती व्यवसाय   बेभरवशाचा  होत चालला आहे.  कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकर्‍यांची पाठ सोडायला तयार नाही. निसर्गाबरोबरच पीक विमा कंपन्याही शेतकर्‍यांसोबत रडीचा डाव खेळत असल्याने नेमकी दाद कोणाकडे मागायची? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.  यावर्षी  सोयाबीन पीक बहरण्याच्या स्थितीत असताना पावसाने हुलकावणी दिली.  भर पावसाळ्यात  दुष्काळाचे सावट घोंगावले. वैशाख वनवा पेटला. जमिनीला भेगा पडल्या.  उभ्या  सोयाबीन पिकांच्या शेंगांची पापडी झाली.

निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या  शेतीची अक्षरशः माती झाली.  पांढरे सोने काळवंडले. कापसाला बोंडअळीने तर सोयाबीनला अत्यल्प पावसाने गाठल्याने  शेतकर्‍यांच्या नजरा पीकविम्याकडे  होत्या मात्र विमा कंपनीने ऐनवेळी  काखा  वर केल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

Tags : Farmers still do not have crop insurance