Thu, Jul 18, 2019 14:22होमपेज › Marathwada › नव्या उमेदीने बळीराजा कामाला

नव्या उमेदीने बळीराजा कामाला

Published On: May 28 2018 1:52AM | Last Updated: May 27 2018 10:48PMसेलू : प्रतिनिधी 

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मात्र अशा नाजूक परिस्थितीतही नव्या उमेदीने बळीराजा मान्सूनपूर्व मशागतीला लागला आहे.

गतवर्षी मान्सून वेळेवर दाखल झाला मात्र तब्बल दीड महिन्याची उघाड दिल्याने शेतकर्‍यांनी पेरणी केलेले सोयाबीन, मूग, उडीद ही पिके हातची गेली, तर केवळ दीड महिन्याच्या उघाडीतही जिवंत राहिले ते कापाशीचे पीक. शेतकरी राजाची मदार कपाशी पिकावर.

मात्र या कपाशी पिकावरही बोंडअळी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट झाली. मग बळीराजा आर्थिक संकटात सापडला. संकटे काही केल्या पिच्छा सोडत नव्हते. रब्बी पिके बहरात असताना गारपिटीचा तडाखा बसला. उभ्या पिकांचे नुकसान झाले. परत आर्थिक संकट बळीराजावर कोसळले. मात्र बळीराजा परत एकदा नव्या उमेदीने कामाला लागला आहे. 

शेतकर्‍यांनी पैसा आणायचा कोठून?

मान्सूनचे आगमन लवकर होणार या आशेवर मान्सूनपूर्व मशागतीची कामे करून घेण्यात मग्‍न आहेत; परंतु मान्सून दाखल झाल्यानंतर पेरणी करण्यासाठी तसेच बियाणे, खते खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक पाठबळ मात्र नाही. कारण गतवर्षी पिकांचे नुकसान होऊन उत्पन्नात घट झाल्याने आर्थिक वेळापत्रक कोलमडले. आर्थिक संकट कायम असल्याने नवीन बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पैसा उपलब्ध नाही, तर वर्षाचा कालावधी उलटूनही कर्जमाफीचा घोळ कायम असल्याने बँका कर्ज देत नसल्याचे वास्तव समोर आहे. मग पैसा आणायचा कोठून हा प्रश्‍न बळीराजासमोर उभा राहत आहे.

शासनस्तरावरून केवळ घोषणा, आश्‍वासनापलीकडे काहीच नाही. पीककर्ज माफी झालेल्या शेतकर्‍यांना नवीन पीककर्ज वाटप नाही. तसेच पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांची बोळवण केली. बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळाले नाही. ही सर्व सरकारी धोरणे शेतकर्‍यांच्या मुळावर येत आहेत. एकीकडे शासन खताचे भाव वाढवत आहे तर शेतीमालाचे भाव कमी होत आहेत. खताचे भाव वधारल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित विस्कळीत होणार आहे, तरीही शेतकरी राजा या गोष्टीची तमा न बाळगता नव्या उमेदीने नव्या आशेने मान्सूनपूर्व मशागतीत मग्‍न आहे, मात्र आर्थिक जुळवाजुळव करताना नाकी नऊ होत आहेत.