Wed, Apr 24, 2019 00:04होमपेज › Marathwada › रस्त्यासाठी शेतकर्‍यांची ससेहोलपट

रस्त्यासाठी शेतकर्‍यांची ससेहोलपट

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 10:00PMपरभणी : प्रतिनिधी

जिंतूर तालुक्यातील  करपरा मध्यम प्रकल्प निवळी येथील कालव्याच्या चैन क्र.1300 मी. ते 1800 मी. दरम्यान झालेल्या विभाजनामुळे शेतकर्‍यांच्या रस्त्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे नळकांडे टाकून रस्ता बनवून देण्यात यावा. याकरिता जायकवाडी पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे, परंतु रस्त्यासाठी शेतकर्‍यांना विभागाच्या कार्यालयास खेटे मारूनही तो मिळत नसल्याने ससेहोलपट होत असल्याची खंत शेतकर्‍यांनी व्यक्‍त केली आहे. 

निवळी बु. च्या शिवारातून करपरा मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा काढण्यात आला आहे. या कालव्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या एकाच गटामधील शेतजमिनीचे दोन-दोन हिस्से झालेले आहेत. खोल असलेल्या कालव्यामुळे शेताच्या एका भागातून दुसर्‍या भागात शेतीची कामे व शेतमाल वाहतूक करावी लागत आहे. कालव्यातील गाळामुळे बैलगाडी ओढून नेणे ही जीवावर बेतले आहे. स्त्री मजूरांना देखील कावा ओलांडून जाणे जिकिरीचे झालेले आहे. माल घेवून वाहतुक करण्यासाठी दोन्ही बाजूने खोदून त्यास उतार देऊन शेतकरी बैलगाडीने शेतमालाची वाहतुक करीत आहे. वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाल्याने शेतकर्‍यांनी मध्यवर्ती पिके घेणे  बंद केले आहे. 

अनेकवेळा कालवा फुटून शेतकर्‍याचे व कालव्याचे नुकसान होत आहे. या संदर्भात शेतकर्‍यांनी अनेक वेळा निवेदने देऊन रस्ता तयार करुन देण्यात यावा, अशी मागणी केली परंतु प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत या संदर्भात गांभीर्यपूर्वक लक्ष देवून रस्ता तयार करुन देण्यात यावा अशी मागणी कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर सरुबाई ठोंबरे, रामेश्‍वर ठोंबरे, अनुराधा ठोंबरे, पांडूरंग अण्णासाहेब, पंढरी जगन्‍नाथ आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.