Sun, Mar 24, 2019 12:25होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांना मिळाले कृषी विभागाचे बळ

शेतकर्‍यांना मिळाले कृषी विभागाचे बळ

Published On: Apr 24 2018 1:06AM | Last Updated: Apr 23 2018 11:23PMहिंगोली : प्रतिनिधी

पारंपरिक शेतीकडून हळूहळू परिसरातील शेतकर्‍यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागाच्या योजनांचा लाभही शेतकर्‍यांना मिळत असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाने सन 2017-18 या वर्षात विविध योजनांंतून 129 ट्रॅक्टरसह 401 औजारांचे वाटप करण्यात आले. जवळपास 530 औजारांचे वाटप करण्यात आल्याने शेतकर्‍यांना बळ मिळाले आहे.जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने सन 2017-18 वर्षामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अशा योजना हाती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हाभरातील अनेक शेतकरी लाभार्थींनी कृषी विभागाकडे रितसर अर्जही केले होते.

त्यानुसार विविध योजनांतून जवळपास 129 ट्रॅक्टरसह 401 औजार असे एकूण 530 औजारांचे वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकर्‍यांना या विविध योजनांतून बळ मिळाल्याचे दिसून येत आहे. 129 ट्रॅक्टरसाठी लाभार्थींना 1 कोटी 56 लाख 40 हजार 412 रुपये तर 401 औजारांसाठी 1 कोटी 88 लाख 95 हजार 767 रुपये असे एकूण 3 कोटी 45 लाख 36 हजार 179 रुपये लाभार्थींच्या थेट खात्यावर जमा करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्याचा विचार करता, गत तीन वर्षांपासून या ना त्या कारणांमुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सामनाही जिल्हाभरातील शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात कमालीची घट आल्याचे पाहावयास मिळेल. या अनुषंगाने शेतकर्‍यांना आधुनिक शेतीसाठी कृषी विभागाच्या विविध योजनांतून बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणल्या. त्यानुसार शेतकर्‍यांना कोणकोणत्या भौतिक वस्तू लागतील याचा आढावा घेण्यात आला होता. या माध्यमातून कृषी विभागाच्या वतीने जिल्हाभरातील शेतकर्‍यांना अनुदान तत्त्वावर ट्रॅक्टर, विद्युत पंप, पंप संच, पाईप, औजारे आदी शेतीउपयोगी साहित्य पुरविण्यात येत आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकरी लाभार्थी विविध योजनांतून आपली प्रगती साधत असल्याचे चित्र आहे.

प्रमुख पिकांची प्रत्यक्षात प्राप्त होणारी उत्पादकता व या पिकाच्या अनुवांशिक पिकातील उत्पादन क्षमतेतील तफावत कमी करणे. तसेच शेतकर्‍यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक उत्पन्न जास्त करून देणे हा या योजनेपाठीमागील उद्देश आहे. त्यानुसार सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाभरातील शेतकरी समोर येत असल्याचे चित्र आहे,  तर योजनेत काही फेरफार होऊ नये यासाठी गत वर्षापासून शेतकरी लाभार्थींच्या खात्यावर थेट अनुदानाची रक्कम जमा केली जात असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

Tags : Marathada, Farmers, power,  agriculture, department