Sat, Nov 17, 2018 20:59होमपेज › Marathwada › पीक कर्जासाठी शेतकरी बँकेच्या दारी

पीक कर्जासाठी शेतकरी बँकेच्या दारी

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:34PMबीड : प्रतिनिधी

खरीप हंगाम अवघ्या महिना-दीड महिन्यावर आला असल्याने शेतकर्‍यांनी पुन्हा शेती मशागत, बियाणांच्या खरेदीसह खताची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी दीड लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली  आहे. पीक कर्जासाठी  सातबारा, ऊस लागवड नोंद आदींची जुळवाजुळव शेतकरी करू लागले आहेत. 

पीक पाणी चांगले आलेच तर व्यापारी शेतकर्‍यांची लूट करतात तर अनेकदा शेतकर्‍यांचा हमीभावही मिळत नाही. यामुळे त्यांच्या डोईवरचे कर्ज काही उतरण्याचे नाव घेत नाही. यावर्षी बीड जिल्ह्यात एक लाख 49 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा लाभ झाला आहे. कर्जमाफीसाठी एकूण 713 कोटी रुपये मिळाले आहेत. शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावरील दीड लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ झाले आहे. हंगाम सुरू झाल्याने  नवीन पीक कर्जासाठी  शेतकर्‍यांना बँकेत चकरा माराव्या लागत आहे.

सध्या शेतकर्‍यांनी शेतीची उन्हाळकामे हाती घेतले आहेत. अनेक शेतकर्‍यांकडे बैल नसल्याने आता ट्रॅक्टरने नांगरणी करण्यात येत आहे. तर, काही शेतकरी पाइपलाइन करण्याचे काम करीत आहेत. ज्या शेतावर पावसाळ्यात वाहन जात नाही, असे शेतकरी आताच खत खरेदी करून शेतात नेऊन ठेवतात. बाजारात बियाणांची जाहिरातबाजी सुरू आहे, तर दुसरीकडे बियाणांची दुकानेही आता सजू लागली आहेत. यामुळे औंदा काय लावणार? अशी चर्चा पारा-पारावर रंगू लागली आहे. 

जमिनीची मशागत, खत-बियाणे खरेदी यासाठी शेतकरी आता बँकांमध्ये चौकशी करू लागला आहे. यासाठी सातबारा, ऊस असेल तर लागवड केल्याची नोंद, कारखान्याचे हमीपत्र आदींची जमवाजमव करू लागला आहेे.  

गतवर्षी 17 टक्के कर्ज वाटप

गतवर्षी खरीप हंगामासाठी एक हजार 927 तर रबी हंगामासाठी 340 कोटींचे कर्ज वितरण करण्यात येणार होते. गतवर्षी कर्जमाफीचा घोळ असल्याने खरिपाचे कर्जवाटप केवळ 17.30 टक्केच झाले होते. त्यामुळे यंदातरी बँकांनी पूर्ण कर्जवाटप करावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

 

Tags : beed, beed news, Farmer, crop loan, bank,