होमपेज › Marathwada › बोंडअळी अनुदानाची शेतकर्‍यांना प्रतीक्षा

बोंडअळी अनुदानाची शेतकर्‍यांना प्रतीक्षा

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 10:58PMसोनपेठ : राधेश्याम वर्मा

खरीप हंगामातील कापसावर बोंडअळीने सर्वत्र हल्ला चढविल्यामुळे तालुक्यात कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली.यामुळे प्रशासनाने पंचनामे करून शासनाला मदतीचा अहवाल पाठवला, परंतु शासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलले नाही. यामुळे तालुक्यातील 31 हजार शेतकर्‍यांना बोंडअळीच्या मदतीची प्रतीक्षा आहे.

मागील चार ते पाच वर्षांपासून असणार्‍या निसर्गाच्या कोपातून शेतकरी याही वर्षी सुटला  नसल्याचे सध्याच्या वातावरणातून दिसून येत आहे. तालुक्यातील दोन्ही मंडळात बर्‍याच   शेतकर्‍यांनी विविध कंपनीच्या कापसाची लागवड केली होती, परंतु कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दुष्काळी परिस्थितीही कठीण प्रसंगांना तोंड देणा-या शेतकर्‍यांच्या नशिबी पुन्हा एकदा बोंडअळीचा संघर्ष उभा राहिला आहे. यावर्षीच्या खरिपात निसर्गाने पाठ फिरवत मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या पदरी निराशा आणली मात्र याही परिस्थितीशी तोंड देऊन तब्बल 3 वेळा पेरणी करून शेतकर्‍यांनी ती पिके जोपासली होती.तालुक्यात नगदी पीक म्हणून ओळख असणार्‍या कापसाचा वाढता उत्पादन खर्च त्या तुलनेत मिळणारा अल्प दर व मजुरांची कटकट तरीही सोनपेठ तालुक्यात कापूस हेच मुख्य पीक आहे.यावर्षी अनियमित पावसामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. या घटत्या उत्पादनास कारणीभूत ठरली आहे ती गुलाबी बोंडअळी. या अळीच्या तडाख्याने तालुक्यातील कापसाचे पूर्ण पीक हातचे गेले आहे.

Tags : Marathwada, Farmers, Wait,  Subsidy