Fri, Apr 26, 2019 04:00होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांची तूर अजूनही घरातच पडून

शेतकर्‍यांची तूर अजूनही घरातच पडून

Published On: Apr 21 2018 1:02AM | Last Updated: Apr 20 2018 11:09PMबीड ः प्रतिनिधी

वडवणी तालुक्यासह बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातील सर्व शासकीय तूर खरेदी केंद्रे 19 एप्रिलपासून बंद करण्यात आले आहेत. शासनाच्या वेबसाईटवर ऑनलाइन नोंद करुनही अर्ध्या शेतकर्‍यांच्या हजारो क्विंटल तुरीचे मापे झाले नाहीत. शेतकर्‍यांच्या घरातच तुरी धूळखात पडल्या आहेत.

महाराष्ट्र सरकारने नाफेड मार्फत शासकीय तूर खरेदी केंद्रे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात यावर्षी सुरू केले आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्यामार्फत ज्या त्या जिल्ह्यातील तुरीच्या खरेदीचे नियोजन शासनाने केले आहे. मात्र बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय तूर खरेदी केंद्रावर या वर्षी योग्य नियोजन करण्यात आले नसल्याने तुरीचे मापे वेळेवर करण्यात खरेदी यंत्रणेला अपयश आले. बीड जिल्ह्यातील सर्वांत लहान तालुका असणार्‍या वडवणी तालुक्यातील तूर खरेदीचे देखील योग्य नियोजन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना लावता आले नाही. दोन फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या वडवणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर असा एकही आठवडा गेला नाही की ज्या आठवड्यात तूर खरेदी केंद्र बंद पडले नाही. अडीच महिन्याच्या काळात या केंद्रावर अडीच हजार शेतकर्‍यांपैकी एक हजार शेतकर्‍यांचे मापेदेखील झाले नाहीत. अजून जवळपास बाराशे ते तेराशे शेतकर्‍यांचे मापे होणे बाकी आहे. शेतकर्‍यांच्या घरातच तूर पडून आहे. अठरा तारखेला तूर खरेदी केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.