Tue, Jul 23, 2019 19:12होमपेज › Marathwada › मोसंबी लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल

मोसंबी लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल

Published On: Aug 24 2018 12:45AM | Last Updated: Aug 23 2018 8:56PMधोंडराई : तुकाराम धस

आठ दिवसांपूर्वी सलग तीन ते चार दिवस झालेल्या रिमझिम पावसाने गेवराई तालुक्यातील धोंडराई परिसरात शेतीकामांना वेग आला आहे. तालुक्यातील तळणेवाडी येथील शेतकरी शंभर ते सव्वाशे एकरवर मोसंबीची लागवड करत असून खतांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये शेतकर्‍यांची गर्दी होत आहे.

पावसाने धोंडराई परिसरातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. शेतामध्ये रान वापसा होताच ऊस, कापूस, सोयाबीन, मका, कडवळ या पिकांवर मजुरांमार्फत खतांचा डोस देण्याचे काम सुरू आहे. तळणेवाडी येथील  शेतकरी आता नगदी पीक असलेल्या मोसंबीची लागवड करत असून त्यांना कृषी अधिकारी काकासाहेब पंडित यांचे मार्गदर्शन लाभत आहे. जालना, औरंगाबाद, आडूळ येथून रोपे आणली जातात. या रोपांना उजव्या कालव्यावरील पाइपलाइन तसेच विंधन विहिरी, शेततळ्यांतून पाणी दिले जाते. सध्या शेतात थोड्या पावसावर कापूस लावल्यामुळे कापसात दोन बाय दोन व सोळा बाय सोळा लांबी, रुंदी असलेला खड्डा तयार करून लागवड केली जात आहे. 

शंभर एकरावर लागवड

धोंडराई परिसरात मोसंबी शंभर ते सव्वाशे एकरवर प्रथमच मोसंबीची लागवड करण्यात येत आहे. तळणेवाडी शेतकरी तुकाराम बोरकर यांनी साडेपाच एकरमध्ये 850 मोसंबीची रोपे लावली आहेत. यातून जवळपास 40 ते 50 टन मोसंबीचे उत्पादन होण्याची शक्यता बोरकर यांनी वर्तविली.

विक्रीसाठी नागपूर, जालना येथील बाजारपेठ

मोसंबीसाठी नागपूर, जालना येथे मोठी बाजारपेठ आहे, तसेच काही व्यापारी थेट शेतात जाऊन मोसंबी खरेदी करतात. पंधरा हजार ते तीस हजार रुपये टन असा मोसंबीला भाव आहे. फ ळ मध्यम स्वरुपाचे असेल तर वीस हजार रुपये भाव हमखास मिळतो. यामुळे शेतकर्‍यांनी यंदा मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.