Thu, Jun 27, 2019 09:41होमपेज › Marathwada › खरीप तोंडावर; शेतकर्‍यांना बी-बियाणे, खताची चिंता

खरीप तोंडावर; शेतकर्‍यांना बी-बियाणे, खताची चिंता

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:09PMगेवराई : विनोद नरसाळे 

तालुक्यातील शेतकरी पावसाळा जसा तोंडावर येत आहे त्याप्रमाणे शेतात मान्सून पूर्व शेती मशागतीच्या कामांना प्राधान्य देत असून लगबग करताना दिसत आहे, परंतु गतवर्षी बोंड अळीने अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आता पेरणीसाठी बी-बियाणे कसे उपलब्ध करावे, अशी चिंता लागून आहे.

तालुक्यात गतवर्षी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने उत्पादनात विक्रमी घट झाली होती. यामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला असून कोलमडला होता, दरम्यान शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात असून अधिकच कर्जबाजारी होत आहे. गतवर्षी बोंड अळीने शेतीत केलेला खर्चही शेतकर्‍यांच्या हातात पडला नाही. त्यामुळे गतवर्षी शेतीसाठी उधारीवर घेतलेले बी-बियाणे, कर्ज शेतकर्‍यांना फेडणे अशक्य झाले होते. त्यातच आता मान्सुनचे आगमन लवकर होणार असल्याचे हवामान विभागाकडून वर्तविले जात आहे. त्यामुळे खरीप तोंडावर आला असल्याने शेतकर्‍यांना बी-बियाणे, खतांची चिंता लागून आहे.

गेवराई तालुक्यात सर्वाधिक कापसाची लागवड होत असून यासाठी बियाणे, खते, फवारणी, मजूर खर्च असा मिळून हेक्टरी 25 ते 30 हजार खर्च येत असल्याने उत्पादन निघेपर्यंत ऐवढी रक्कम आणायची कोठून असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. शेतात सध्या पेरणीसाठी पाळ्या घालणे, मोघडणे, काड्या-कुड्या वेचने, ठिबक हातरणे आदी उन्हाळी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे अधीच बोंडअळीग्रस्त परीस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांकडे पैसेच नसल्याने बियाणे, खते, औषधे खरेदी कसे करावे यामध्ये शेतकरी सापडला असून एकप्रकारे चिंता लागली आहे.

गेल्या वर्षी शेतकर्‍यांचे बोंड अळीने न भूतो न भविष्यती एवढे मोठे नुकसान झाले होते. यानंतर शासनाने बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे, मात्र अद्यापही या अनुदान वाटपाबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नाही, दरम्यान या अनुदान रक्कमेचे तत्काळ वाटप केल्यास शेतकर्‍यांना बी-बियाणे खरेदी करण्यास हातभार लागेल.  - राजेंद्र डाके पाटील,अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.