Wed, Mar 27, 2019 01:58होमपेज › Marathwada › कासारीत शेतकर्‍याचा खून

कासारीत शेतकर्‍याचा खून

Published On: May 10 2018 1:37AM | Last Updated: May 09 2018 10:52PMआष्टी : प्रतिनिधी

तालुक्यातील कासारी येथील शेतकरी शिवाजी पोपट गिरी (वय 40) यांचा बुधवारी दुपारी खून करण्यात आला. शिवाजी पोपट गिरी हे  शेतातील जनावरांच्या गोठ्यात थांबलेले होते. गणेश लक्ष्मण पुरी (वय 34) व त्याची पत्नी तेथे आले. त्यांची शिवाजी गिरी यांच्यासोबत बाचाबाची झाली. याच दरम्यान अचानक गणेश पुरी याने आपल्याकडील गुप्तीने शिवाजी गिरी यांच्यावर वार केले. ही घटना अचानक घडत  गणेशच्या पत्नीने व शिवाजी गिरी यांचा कामगार आश्पाक पागर याने गणेशला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो दोघांना झिडकारत शिवाजी यांच्यावर वार करत राहिला. यात शिवाजी गिरी यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर गणेश पुरी व त्याच्या पत्नीने घटनास्थळावरून पळ काढला.

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केल्यांतर तेथे गुप्ती आढळून आली. पो. नि. सय्यद शौकत अली व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनेचा पंचनामा केला असून शिवाजी गिरी यांचे सासरे बुवासाहेब रामभाऊ बन यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गणेश पुरी व त्यांच्या पत्नीने संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिवाजी गिरी यांच्यावर रात्री कासारी येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे, दरम्यान शिवाजी गिरी व गणेश पुरी यांचा दुग्ध व्यवसाय असून आर्थिक देवाणघेवाणीतून ही घटना  घडल्याची शक्यता ग्रामस्थांतून वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे शिवाजी गिरी यांनी अत्यल्प कालावधीत या व्यवसायात उभारी घेतली होती.