Thu, Apr 18, 2019 16:38होमपेज › Marathwada › महिन्यानंतरही शेतकरी पीक विम्यापासून वंचित

महिन्यानंतरही शेतकरी पीक विम्यापासून वंचित

Published On: Jun 03 2018 1:15AM | Last Updated: Jun 02 2018 11:12PMबीड : प्रतिनिधी

नैसर्गिक संकटाने किंवा इतर कारणाने शेतीपिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, यासाठी शेतकर्‍यांनी प्रसंगी लाठ्या-काठ्या खाऊन पीक विमा भरला. यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला, मात्र विम्याची रक्कम येऊन दीड ते दोन महिने झाले, यानंतरही शेतकर्‍यांना पैसे मिळत नसल्याने शेतकर्‍यांवर ऐन खरीपाच्या तोंडावर संकट कोसळले आहे. 

पाऊस, वादळ यासह इतर कारणांनी पीकाचे नुकसान झाल्यास विमा मिळतो, अशी शेतकर्‍यांना खात्री असल्याने गेल्या काही वर्षांत शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिकांचा विमा भरतात. गतवर्षीही जिल्ह्यात साडेतीन ते चार लाख शेतकर्‍यांनी विमा भरला. यासाठी बँकांच्या दारामध्ये दिवस-दिवस शेतकर्‍यांनी रांगा लावल्या, तर बँका रविवारीही सुरू ठेवल्या होत्या. वेळप्रसंगी शेतकर्‍यांनी पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्ल्या व पीक विमा भरला. 

गेल्या हंगामात बोंडअळी, अतिवृष्टी व नैसर्गिक संकटाने शेतकरी हतबल झाला. बोंडअळीने कापसाचे तर पाऊसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 263 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. हा विमा सात जून पर्यंत वाटप करावा, अशा राज्य सरकारच्या सूचना आहेत, मात्र पीक विमा मंजूर होऊन दीड महिना लोटला तरीही पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. 

आता खरीपाची तयारी सुरू झाली आहे. शेतकरी बियाणे, खते खरेदी करू लागली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आता पैशांची गरज आहे. अशा परिस्थितीत पीक विमा न मिळाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांसह सहकारी बँकांनीही अद्याप विम्याचे पैसे देण्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे शेतकरी बँकांच्या दारात खेटे मारत आहेत. सात जून पूर्वी विमा वाटपाच्या राज्य सरकारच्या सूचनेलाही बँक अधिकारी दाद देत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यांना नाविलाजाने खासगी सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी विमा वाटप करण्याची मागणी होत आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तीन लाख 38 हजार शेतकर्‍यांनी पीक विमा भरला आहे. यातील सोयाबीन पिकाची 20 हजार 798 शेतकर्‍यांची यादी आली आहे. ही यादी तपासण्याचे काम सुरू आहे. 7 कोटी आले असून डीसीसीच्या चार शाखांमधील शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे टाकले आहेत. उर्वरित पैसे आल्यावर वाटप केले जातील.   -बी. व्ही. कुलकर्णी, डीसीसी बँक, बीड.

शेतकर्‍यांना सध्या खरीप पेरणी करावयाची आहे. यासाठी जमीन मशागत, बियाणे खरेदी शेतकर्‍यांना करावयाची आहे. राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी शेतकर्‍यांना पीक विमा वाटप सुरू करावा. यामुळे शेतकर्‍यांना खासगी सावकारांच्या दारात जाण्याची वेळ येणार नाही. - रामेश्‍वर गाडे, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना, गेवराई.