Tue, Apr 23, 2019 19:33होमपेज › Marathwada › पहिल्याच पावसात शेतीचे नुकसान 

पहिल्याच पावसात शेतीचे नुकसान 

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 11 2018 12:30AMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्हाभरात गुरुवारी (दि. 7) मध्यरात्री मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. वसमत तालुक्यातील धामणगावसह धामणगाव वाडी परिसरातील शेतकर्‍यांची दोन दिवसांंपूर्वी आधुनिक पद्धतीनी बेडवर हळद तसेच कपाशीचे मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र पावसामुळे हळदीसह कपाशी लागवड केलेली शेती खरडल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. तसेच अनेक शेतकर्‍यांचे शेती उपयोगी साहित्य पुरात वाहून गेल्याने ते हतबल झाले.

मागील चार वर्षांचा विचार करता यंदाच्या मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी आपली शेतीतील मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी सज्ज केली होती. ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे, अशा शेतकर्‍यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी आधुनिक पद्धतीने बेडवर हळद लागवड केली. काहींनी ठिबकच्या माध्यमातून कपाशी लागवडीला सुरुवात केली होती. यंदा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला. त्याप्रमाणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी बाजारातून विविध बी-बियाणे, खते, ठिबक, पाईप आदी साहित्य घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.

शुक्रवारी व शनिवारी असे सतत दोन दिवस पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची एकच धावपळ उडाली, तर अनेकांनी बेडवर लावलेल्या हळदीसह कपाशी खरडल्याने मोठे नुकसान झाले. वसमत तालुक्यात मृग नक्षत्राच्या तोंडावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात हळदीसह केळी, ऊस, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग आदी पिके घेतली जातात. त्यानुसार यंदा तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी आपल्याकडे असलेल्या पाण्याचे नियोजन करून बेडवर मोठ्या प्रमाणात हळद, तर ठिबकद्वारे कपाशीची लागवड केली होती. मात्र मृग नक्षत्राच्या दमदार पावसामुळे लागवड केलेल्या हळदीसह कपाशी शेतातून नदी तसेच ओढ्याचे पाणी वाहिल्याने मोठे नुकसान झाले. यात अनेक शेतकर्‍यांनी लावलेली हळद पुरात वाहून गेली. तसेच शेती उपयोगी साहित्य ज्यामध्ये ठिकबचे बंडल, पाईप आदी वाहून गेल्याने शेतकरी ऐन खरिपाच्या तोंडावर अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.