Tue, Apr 23, 2019 23:39होमपेज › Marathwada › ७० वर्षीय किसन आबांचे सोयाबीन अनुदानासाठी खेटे

७० वर्षीय किसन आबांचे सोयाबीन अनुदानासाठी खेटे

Published On: Jan 31 2018 2:05AM | Last Updated: Jan 31 2018 12:57AMहिंगोली : प्रतिनिधी

राज्य शासनाने ऑक्टोबर 2016 ते डिसेंबर 2016 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या सोयाबीनला प्रतिक्‍विंटल दोनशे रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार तालुक्यातील किसन मस्के यांनी येथील बाजार समिती यार्डात 20 क्‍विंटल सोयाबीनची विक्री केली होती, परंतु बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे अद्यापही त्यांना सोयाबीनवरील अनुदान मिळाले नाही. किसन आबा बाजार समितीच्या सचिवासह जिल्हा उपनिबंधकांकडे हेलपाटे मारून थकले तरी त्यांना अद्यापही न्याय देण्यास बाजार समिती प्रशासन अपयशी ठरले आहे.

जमिनीचा मावेजा मिळत नसल्याने मंत्रालयात हेलपाटे मारून पदरी अपयश आल्याने धर्मा पाटील यांनी विष घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना ताजी असताना येथील बाजार समिती प्रशासन अजूनही कुंभकर्णी झोपेत असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील पार्डा येथील किसन नारायण मस्के (वय 70) यांनी 3 नोव्हेंबर 2016, 4 नोव्हेंबर 2016, 25 नोव्हेंबर 2016 या कालावधीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात बालमुकुंद काबरा यांच्या अडतीमध्ये 20 क्‍विंटल सोयाबीनची विक्री केली होती. त्यांच्याकडे विक्री केलेल्या अडत्याकडून मिळालेल्या पावत्या आहेत. राज्य शासनाच्या घोषणेनुसार प्रतिक्‍विंटल 200 रुपयांचे अनुदान मिळण्यास ते पात्र होते. 

किसन मस्के यांनी आपले अनुदान मिळण्यासाठी बाजार समितीकडे अर्जासह पावत्या व हैदराबाद बँकेचा खाते नंबर जोडला होता. सर्व शेतकर्‍यांचे पैसे आले तरी मस्के यांना पैसे आले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांच्याकडे मागील महिनाभरापासून चकरा मारून अनुदान का मिळाले नाही अशी विचारणा केली, परंतु बाजार समितीच्या सचिवाने आपला अर्ज गहाळ झाल्याचे सांगत  अर्जाचा शोध घेत आहोत असे सांगितले. त्यानंतर मस्के यांनी जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून त्यांच्याकडे सोयाबीन अनुदानासंदर्भात विचारणा केली असता, त्यांच्याकडे असलेल्या यादीत त्यांचे नाव नसल्याचे सांगून बाजार समितीत चौकशी करण्याचे सांगितले. पुन्हा मस्के यांनी बाजार समितीकडे हेलपाटे मारले, परंतु त्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. न्याय मिळत नसल्याने त्यांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मस्के यांच्याकडे बाजार समितीला दिलेल्या अर्जाची प्रत असूनही बाजार समितीच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर सोयाबीनच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.