Thu, Jul 18, 2019 16:32होमपेज › Marathwada › कर्जमाफी योजनेस मुदतवाढ

कर्जमाफी योजनेस मुदतवाढ

Published On: Jun 01 2018 2:07AM | Last Updated: May 31 2018 10:50PMहिंगोली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासन निर्णयात बुधवारी (दि.9) सदर योजनेच्या व्याप्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेत 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 या कालावधीत घेतलेल्या कर्जापैकी केंद्र व राज्य शासनाच्या सन 2008 व सन 2009 च्या कर्जमाफी योजनांचा फायदा न मिळालेल्या 30 जून 2016 रोजी थकीत असलेल्या पीक/पुनर्गठीत व मध्यम मुदत कर्जांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2016 या कालावधीत वाटप केलेल्या इमू पालन, पॉली हाऊस व शेडनेटसाठी मध्यम मुदत कर्ज प्रकारांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

शासन निर्णयाच्या अनुषंगाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी विहित  कालावधीत सदर कर्ज प्रकाराच्या बाबत नव्याने अर्ज करणे किंवा यापूर्वी 22 सप्टेंबर 2017 पर्यंत तसेच 1 मार्च 2018 पासून पोर्टलवर ऑनलाईन सादर केलेल्या अर्जामध्ये सदर कालावधीतील कर्ज प्रकारासंबंधी माहितीचा  समावेश करणे आवश्यक आहे. सदर कर्ज प्रकारांशी निगडीत शेतकर्‍यांना त्यांच्या कर्जखात्यांची  माहिती नवीन अर्जाद्वारे किंवा यापूर्वी केलेल्या अर्जात बदल करून ऑनलाइन पध्दतीने सादर करण्यासाठी संबंधित संकेतस्थळाच्या पोर्टलवर मंगळवारी (दि.5) पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात  आलेली आहे.

सदर योजनेच्या यापूर्वीच्या निकषात कोणताही बदल करण्यात आलेला नसून बुधवारी (दि.9) शासन निर्णयान्वये या योजनेची व्याप्ती वाढवून यामध्ये केवळ सन 2008 व सन 2009 च्या कर्जमाफी योजनांचा लाभ मिळाला नसलेल्या 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील पीक/पुनर्गठन व मध्यम मुदती कर्जाचा व 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2016 या कालावधीत  वाटप केलेल्या इमू पालन, पॉली हाऊस व शेडनेट यासाठी मध्यम मुदत कर्ज प्रकारांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.