Sat, Apr 20, 2019 18:46होमपेज › Marathwada › बांधकामास दिली दोन वेळेस मुदतवाढ;  मुदत संपूनही रस्त्याचे काम सुरूच

बीडमधील खोदकाम संपेना

Published On: Jun 01 2018 2:07AM | Last Updated: May 31 2018 11:19PMबीड : दिनेश गुळवे

महाराष्ट्र नगरोत्थान योजनेतून बीडकरांसाठी तब्बल 23 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आले होते. यासाठी निधीही मिळाला. सदरील रस्ते दोन वषार्र्ंत पूर्ण करावयाचे होते, मात्र आता पाच वर्ष झाल्यानंतरही रस्त्यांची कामे कासवगतीने सुरू आहेत. काही ठिकाणी अद्यापही काम सुरू असले, तरी रस्ते झालेल्या ठिकाणी खड्डे पडू लागली आहेत. त्यामुळे या रस्त्याची अवस्था पुढले पाठ, मागचे सपाट अशी होत आहे. 

बीड शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असे बीडकरांना म्हणावे लागत होते. रस्त्याची दुरवस्था तर झाली होतीच शिवाय अतिक्रमणांनी रस्तेही चिंचोळे झाले होते. त्यामुळे ट्रफिक जामसह वाहनचालविणेही तारेवरची कसरत ठरू लागले होते. नागरिकांचे हाल लक्षात घेऊन 2012 मध्ये महाराष्ट्र नगरोत्थान योजनेंतर्गत बीड शहरातील 23 रस्त्यांना मान्यता देण्यात आली. या रस्ते कामांसाठी तब्बल 29.58 कोटींची निविदा करण्यात आली. यानंतर रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. ही कामे संबंधित ठेकेदारांना दोन वषार्र्ंत पूर्ण करावयाची होती. 

नगरोत्थान योजनेंतर्गत अण्णा भाऊ साठे चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (1190 मीटर), मोमीनपुरा (780 मीटर) यासह बशीरगंज ते सुभाष रोड, राजुरीवेस ते धोंडीपुरा, खासबाग, टिळकरोड आदी 23 रस्ते करण्यात येत आहेत. यातील सुभाष रोड ते मोमीनपुरा याशिवाय इतर रस्ते झाले आहेत. राहिलेल्या दोन रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. रस्ते प्रशस्त झाल्याने वाहतूक सुरळीत झाली, असली तरी रस्त्याचे काम संथगतीने होत असल्याने याचा फटका नागरिकांसह व्यापार्‍यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

वाहतूक वळविल्याने सामान्यांना त्रास

सुभाषरोड, भाजी मंडई यासह इतर रहदारीच्या ठिकाणी अचानक बांधकामासाठी वाहतूक वळविण्यात आली. याचा शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागला. पूर्व कल्पणा न दिल्याने नागरिकांना तब्बल दोन-दोन कि.मी.चा हेलपाटा मारून जावे लागले. 

दोन वेळेस दिली मुदतवाढ

नगरोत्थान योजनेंतर्गतची कामे 2012 पासून दोन वषार्र्ंत पूर्ण करावयाची होती. मात्र ही कामे दोन वषार्र्ंत झाली नाहीत. त्यामुळे या कामांना दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली आहे. आताही दिलेली मुदत मार्च 2018 मध्ये संपली आहे. असे असले तरी अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.