Thu, Jul 18, 2019 02:19होमपेज › Marathwada › ‘राष्ट्रकुल गाजवलं, आता ऑलिंपिकला डाव टाकणार’

‘राष्ट्रकुलनंतर आता ऑलिंपिकला डाव टाकणार’

Published On: Apr 15 2018 8:00AM | Last Updated: Apr 15 2018 8:00AMपाटोदा : महेश बेदरे

आयुष्यातील संघर्ष, मेहनतीच्या बळावर व गुरुंच्या मार्गदर्शनाखाली राष्टकुल स्पर्धा गाजवित देशासाठी सुवर्ण पदक मिळविले... यापुढेही अधिक सराव करून ऑलिंपिक स्पर्धेलाही डाव टाकणार असल्याचा विश्‍वास राहुल आवारे याने व्यक्त केला. राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण पदक पटकावल्यानंतर त्याने दैनिक पुढारीशी संवाद साधला.

बीड जिल्ह्यातील पाटोद्याचा राहुल आवारेने ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत प्रतिस्पर्ध्याला चितपट करीत सुवर्ण पदक पटकावलं. पाटोदा सारख्या ग्रामीण भागातून कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन राहुलने कठोर मेहनत, सराव याच्या बळावर राष्ट्रकुल स्पर्धा गाजविली. या संदर्भात बोलताना राहुल आवारे म्हणाला, की वडील पै. बाळासाहेब आवारे यांनी मोठा संघर्ष व त्रास सहन करून परिस्थितीला तोंड देत मला कायम पाठबळ दिले. पुणे येथे गेल्यानंतर गुरू हरिशचंद्र बिराजदार मामा व काका पवार वस्ताद यांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याची दिशाच बदलली.

देशासाठी काहीतरी करून मातृभूमीचे नाव उंचवायचे हे ध्येय पक्के होते. राष्ट्रकुलसाठी निवड झाल्यावर आनंद तर झालाच, परंतु अपेक्षांचे काहीसे दडपण ही होते, मात्र गुरुचा विेशास व आई-वडिलांच्या आशीर्वादाने हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळविली असले तरी आता 2020 ऑलिंपिक हे ध्येय आहे. ऑलिंपिक स्पर्धेमध्येही आपण प्रतिस्पर्धी खेळाडूस चितपट करून देशासाठी पदक मिळवू, असा विश्‍वासही त्याने व्यक्त केला.

गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मेहनत तर केली होतीच, देशासाठी पदक जिंकायचेच हे ध्येयही होते. ज्या वेळी सुवर्णपदक गळ्यात पडण्याचा क्षण जवळ आला त्यावेळी मनात भावनांचा कल्लोळ होता... जीवनातील सर्व संघर्ष, मेहनतीचा काळ डोळ्यासमोर तरळला...हे पदक स्वीकारताना माझी आई व माझे गुरू हरिशचंद्र बिराजदार मामा व काका पवार यांची प्रकर्षाने आठवण झाल्याचे भावोद‍्गार राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता पाटोदयाचा सुपुत्र राहुल आवारे याने काढले. गुणवंतांना न्याय नक्कीच मिळतो. मी पाटोद्यासारख्या ग्रामीण भागातीलच आहे. त्यामुळे उदयोन्मुख कुस्तीपटूंनीही केवळ मेहनत व जिद्द हेच भांडवल ठेवून यश मिळवावे व देशाचे नाव जगात उंचवाव असेही राहुल म्हणाला.

सुवर्ण पदक जिंकल्यावर आनंदोत्सव

राहुल ने सांगितले की, मी ज्या दिवशी सुवर्ण पदक जिंकले त्या दिवशीचे ते देशासाठी पहिलेच गोल्ड मेडल होते. येथे भारतीय प्रचंड संख्येने आहेत, त्यांनीही आनंदोत्सव साजरा केला.

Tags : Commonwealth, Games, 2018, Indian, Athletes, Wrestler, Gold, Medal, Rahul Aware,