परभणी : प्रतिनिधी
दुग्ध व्यवसायासाठी पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यात पशुपालकांची संख्या जास्त आहे. शेतीला जोड व्यवसाय असलेला शेतकर्यांच्या उन्नतीचा मार्ग म्हणून दुग्ध व्यवसाय महत्त्वाचा असल्याने मोठ्या प्रमाणात तो केला जातो; पण शासनाकडून जिल्ह्यात दूध प्रक्रिया उद्योग स्थापन न केल्याने जिल्ह्यात दुग्ध व्यावसायिकांचे मनोबल खचले आहे. कारण जिल्हा शासकीय दूध संकलन केंद्रातील संकलीत दूध हे परजिल्ह्यातील कारखान्यांमध्ये पाठवल्या जाते. यामुळे शेतकर्यांसाठी दूध विक्रीकरिता अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
दूध संकलन केंद्र जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने हा व्यवसाय संस्थांमार्फत दुधाचे संकलन तालुकानिहाय करण्यात येते; पण त्या संस्थाही व्यावसायिकांच्या सोयीनुसार दूध संकलित करत नसल्याने अनेक शेतकर्यांना दुधावर स्वतःच प्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. अनेक वेळा दूध व्यापार अयोग्य होत असल्याने त्याचे नुकसान व्यावसायिकाला सहन करावे लागते. यामुळे शासनाने व्यावसायिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणीतील दुग्ध शाळेत परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतून दररोजच्या दूध संकलनात ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये सरासरी 8 हजार 735 लिटरने वाढ झाली.