Sun, Jul 21, 2019 07:59होमपेज › Marathwada › इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांची ‘घरवापसी’

इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांची ‘घरवापसी’

Published On: Jun 29 2018 12:56AM | Last Updated: Jun 29 2018 12:18AMआर्वी : जालिंदर नन्नवरे

आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे या हौसेपोटी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांची मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये घरवापसी झाली आहे. विद्यार्थ्यांना न झेपणारा अभ्यास, इंग्रजी शाळांची न परवडणारी फी, विद्यार्थी वाहतुकीचा खर्च व पालकांची घरी अभ्यास न घेण्याची क्षमता यामुळे शिरूर शहरात व ग्रामीण भागात यावर्षी हे प्रमाण वाढले आहे.

काही वर्षांपूर्वी शहरासह ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढली. जिल्हा परिषद व खासगी शाळांमधील मुलांच्या पालकांचादेखील या शाळांकडे कल वाढला होता. यामुळे अनेकांनी आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश दिला, मात्र अवास्तव फी, शाळा ते घर या दरम्यान विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा खर्च तसेच शाळेतील विविध उपक्रमांसाठी येणारा खर्च यामुळे पालकांचे आर्थिक गणित विस्कळीत होत आहे. त्यामुळे काही पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश पुन्हा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत घेतला आहे. 

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना नियमित गृहपाठ देण्यात येतो. हा गृहपाठ काही पालकांच्या अवाक्याबाहेर असल्याने ते विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊ शकत नाहीत. शाळेत जितके शिकविले जाते तितक्यावर विद्यार्थी अवलंबून राहत असल्याने पुढे हा अभ्यास त्याच्याकडून झेपला जात नाही. त्यामुळे शाळेने गृहपाठ दिल्यानंतर विद्यार्थ्याऐवजी पालकांची जास्त परीक्षा असते. शिक्षण, मोफत गणवेश व पुस्तके मिळत असल्याने पालक देखील मराठी शाळांकडे आकर्षित होत असल्याचे शिक्षक शरद भोसले यांनी सांगितले. नाव सेमीचे मात्र अभ्यासक्रम मराठीत, तर शाळा बदलाच्या शर्यतीत मुलांच्या मनस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याचे बबनराव देशमुख यांनी सांगितले. तर, पालकांनाही  अभ्यास घेण्यास अडचणी येत असल्याने सरपंच गोकूळ मोरे यांनी सांगितले.
अभ्यासासह इतर कारणांमुळे सध्या इंग्रजी शाळांकडे पाठ करून विद्यार्थी मराठी शाळेत येत असल्याचे दिसून येत आहे.