होमपेज › Marathwada › इंजिनिअर तरुणाने फुलवली गुलाबाची शेती

इंजिनिअर तरुणाने फुलवली गुलाबाची शेती

Published On: Feb 10 2018 1:34AM | Last Updated: Feb 10 2018 8:58AMगेवराई : प्रतिनिधी

तालुक्यातील वंजारवाडी येथील ईश्वर बजगुडे या उच्च विद्याविभूषीत सॉप्टवेअर इंजिनिअर तरुणाने एका चांगल्या नावाजलेल्या कंपनीतील नोकरीला सोडचिठ्ठी देऊन शेतीव्यवसायात गरुडझेप घेतली आहे. त्यांनी  गुलाबाचे रोपे लागवड करून शेती फुलवली आहे.  यामधून महिन्याला चाळीस हजारांचे उत्पन्न सुरू झाले आहे.

वंजारवाडी येथील पस्तीस वर्षीय ईश्वर नारायण बजगुडे यांचे सॉफ्टवेअर एम.एस.सी. कॉम्प्युटर सायन्स शिक्षण झालेले असून पुणे येथील एका नामांकित कंपनीत नोकरीत होते. त्यांना वडिलोपार्जित आठ एकर जमीन असून यामध्ये एक विहीर आहे. तळेगाव दाभाडे येथे हरितगृह प्रशिक्षण केंद्रात सात दिवसांचे शेतीविषयक प्रशिक्षण घेऊन त्यांनी शेतीत 20 गुंठ्यांत शेडनेटची उभारणी केली. यासाठी आठ लाख खर्च आला तर 3 लाख 88 हजार अनुदान त्यांना कृषी विभागाकडून प्राप्त झाले. शेतीत उभारलेल्या शेडनेटमध्ये त्यांनी सहा महिन्यांपूर्वी टॉप सिक्रेट या गुलाब जातीच्या 11 हजार रोपांची लागवड केली. प्रतिरोप 10 रुपये व औषध फवारणी, मेहनतीसाठी 40 हजार असा त्यांना एकूण दीड लाख खर्च आला. कृषी सहायक महेश बोरुडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत बजगुडे यांना सहकार्य केले आहे. तसेच कृषी विभागामार्फत शेततळे योजनेचा लाभ घेत शेततळ्याची उभारणी केली आहे. या तलावातील पाणी त्यांना उन्हाळ्यात फुल शेतीसाठी उपयोग होणार आहे. गुलाबाच्या शेतीसाठी बजगुडे यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. अभ्यासपूर्ण शेतीव्यवसाय केल्यास शेतीतून भरघोस उत्पादन घेता येते हे बजगुडे यांनी केलेल्या शेतीवरून दिसून येते. 

महिन्याला चाळीस हजारांचे उत्पन्न

फुलशेतीला गुलाबाची फुले चांगलीच लगडली असून दिवसाला एक हजार फुले निघत असून यामध्ये पुढे वाढ होणार आहे. ही गुलाबाची फुले बीड मार्केटमध्ये ते विक्री करत असून प्रतिफूल दोन रुपये भाव मिळत आहे. दरम्यान खर्च वजा जाता 40 हजार महिना उत्पन्न मिळेल असे ईश्वर बजगुडे यांनी सांगितले.

दुसर्‍याच्या बंधनात राहून नोकरी करण्यापेक्षा आपल्या हक्काच्या शेती व्यवसायात उतरून स्वतः काही करून दाखविण्याची जिद्द बाळगून नोकरीला सोडचिठ्ठी दिली. तसेच शेतीचीदेखील आवड होती. त्यामुळे या व्यवसायात पदार्पण केल्याचे समाधान मिळत आहे. 
-ईश्वर बजगुडे, शेतकरी, वंजारवाडी.

पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केल्यास नवतरुण तरुणांना शेतीतून देखील भरघोस उत्पादन मिळू शकते. हे यावरून सिद्ध झाले असून ईश्वर बजगुडे यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
-महेश बोरुडे,कृषी सहाय्यक, मादळमोही कृषी मंडळ