Tue, Jul 16, 2019 22:44होमपेज › Marathwada › बुद्धिबळातून जिल्ह्यात घडले अनेक खेळाडू

बुद्धिबळातून जिल्ह्यात घडले अनेक खेळाडू

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 10:32PMपरभणी : बालासाहेब काळे

परभणी जिल्ह्यात भारतीय बुद्धिबळ संघटनेमुळे या खेळाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अनेक खेळाडूंनी विविध स्पर्धांमधून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. 1975 मध्ये श्री शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी संघटनेची स्थापना केली. यू.एस. शिंदे, के.एस. संघई, ए.एस. रत्नम, के.एस. देशपांडे, पी.जी. शिंदे, ए.एल. मोहन, बी.सी. धूत आणि इतर बुद्धिबळ प्रेमींचा यात समावेश होता. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक दिलीप वीरचंद राके हे असून सचिव रवींद्र पंडित आहेत. राके हे 1980 पासून संघटनेच्या कार्यकारिणीत कार्यरत असून मागील 6 वर्षांपासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. संघटना 43 वर्षांपासून जिल्ह्यात विविध स्पर्धांचे आयोजन करत आहेत. दरवर्षी साधारणपणे 6 स्पर्धा होतात. सध्या महाराष्ट्रात नावलौकिक असलेले अनेक खेळाडू यात सहभागी झाले होते. परभणीचे खेळाडूसुद्धा आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 

बुद्धिचातुर्य, तंत्रकौशल्याच्या बळावरच विजय

बुध्दिबळ हा बौध्दिक कौशल्यावर आधारलेला बैठा खेळ आहे. चौसष्ट घरे (चौरस) असलेल्या पटावर प्रत्येकी सोळा सोंगट्या मांडून दोन खेळाडू तो खेळतात. यात केवळ बुध्दिचातुर्याच्या आणि तंत्रकौशल्याच्या बळावरच खेळाडूला विजय मिळवता येतो. बुध्दिबळाची सुरुवात भारतातून झाली. या खेळात सुरुवात, मध्यपर्व आणि शेवट या तीन पायर्‍या आहेत. खेळाचे अंतिम ध्येय जिंकणे हेच आहे. म्हणून हा खेळ शिकताना प्रथम शेवट, मग मध्यपर्व आणि सुरुवात असा शिकावा. या खेळाच्या सुरुवातीच्या चालीचा हेतू असतो डावाचा विकास करणे, मध्यपर्वाचा हेतू असतो स्थितीवाचक वस्तुनिष्ठ लाभ आणि शेवट या अवस्थेचा हेतू असतो शह आणि मात देणे. 

-दिलीप राके, अध्यक्ष, भारतीय बुद्धिबळ संघटना, परभणी.