Thu, Apr 25, 2019 18:08होमपेज › Marathwada › डाळ मिलच्या माध्यमातून महिलांनी मिळवला रोजगार

डाळ मिलच्या माध्यमातून महिलांनी मिळवला रोजगार

Published On: Aug 24 2018 12:45AM | Last Updated: Aug 23 2018 10:36PMपूर्णा : सतीश टाकळकर

येथील महिलांनी विना पॉलिश मूग, उडीद, तूर, हरभरा डाळीची निर्मिती करून शेतकर्‍यांना डाळ तयार करून देण्यासोबतच स्वतः कडधान्य खरेदी करून त्याची डाळ निर्मिती केली. योग्य पॅकिंग आणि योगिताब्रँड नावाने त्याची विक्री करतात. डाळ मिलच्या माध्यमातून त्या महिलांना रोजगार मिळाला आहे.

भाले कुटुंबीयाचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील कसबे धावंडा. संभाजी भाले यांचा पारंपरिक सुतार कामाचा व्यवसाय आहे. त्यांना रामेश्वर, विश्वनाथ, नवनाथ ही मुले आहेत. शहर परिसरातील 20 ते 25 गावांत डाळमिल नव्हती. शेतकर्‍यांना डाळीसाठी दूरवरील गावात मिलमध्ये जावे लागत असे. भाले कुटुंबात तीन महिला आहेत. तसेच  शेजारील दोन महिला मदतीठी तयार झाल्या. सपनाताईंनी ही गोष्ट लक्षात घेऊन मिनी डाळमिलचा निर्णय घेतला. यासाठी एमसीईडीचे शंकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अहवाल 2016 मध्ये पूर्णेतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडे सादर केला. बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक मुकुंद कांबळे, उपशाखा व्यवस्थापक डॉ. सचिन कापसे, राजेंद्र  ठोंबरे यांनी मुद्रा योजनेंतर्गत महिला गृहउद्योगांसाठी मिल उभारणीस 3 लाखाचे कर्ज मंजूर केले. अकोला येथून मिनी मिल खरेदी केली. यासाठी 1 लाख 94 हजार रुपये खर्च आला. सपनाताईंनी विश्वकर्मा गृहउद्योग नावाने उद्योगाला सुरुवात केली. घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड  केली जाते. 

महिलांना मिळाला रोजगार : विश्वकर्मा गृह उद्योगाच्या मिलमध्ये सपनाताईं सोबत गिरिजाबाई, निकिता भाले या दोघी डाळ निर्मितीचे काम करतात. याशिवाय रूपाली पांचाळ, सत्यभामाबाई पांचाळ यांनाही उद्योगात रोजगार मिळाला आहे.

असे केले मिलचे नियोजन : शेतकर्‍यांनी आणलेल्या तूर, मूग, उडीद, हरभरा आदी कडधान्यांचे प्रथम वजन केले जाते. प्रत्येकाचे नाव, कडधान्याचा प्रकार, वजन आदी माहिती नोंदवहीत ठेवली जाते. धान्य पिशवीवर शेतकरी क्रमांक, नाव. तूर, मूग, उडदाची डाळ तयार करताना योग्य प्रमाणात तेल, पाणी लावून टरफल काढले जाते. टरफले निघालेली डाळ एक दिवस उन्हात वाळवली जाते. हरभर्‍यापासून डाळ तयार करण्यासाठी स्वतंत्र गिरणी आहे. बारा तासांत पंधरा ते वीस  क्विंटल डाळ निर्मितीची मिलची क्षमता आहेे.

डाळ निर्मितीचा हंगाम : मूग, उडीदाच्या डाळ निर्मितीचा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारी कालावधीत असतो. तूर, हरभर्‍याची डाळ जानेवारी ते जूनमध्ये होते. 2016-17 मध्ये तुरीची 200, हरभर्‍याची 250, मुगाची 140, उडदाची 20क्विंटल डाळ तयार केली. 2017-18 मध्ये तुरीची 380, मुगाची 190, उडदाची 120, हरभर्‍याची 260 क्विंटल डाळ तयार झाली.