होमपेज › Marathwada › कर्मचार्‍यांचे आंदोलन, आरोग्यसेवा सलाईनवर

कर्मचार्‍यांचे आंदोलन, आरोग्यसेवा सलाईनवर

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 10:57PMबीड : प्रतिनिधी

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी सहा दिवसांपासून काम बंद करून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा परिणाम जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर झाला आहे. जिल्हाभरातील लसीकरण, प्रसूती, गर्भवती मातांची सोनाग्राफी नोंदणी, शालेय आरोग्य तपासणी यासह नियमित रुग्णांना मिळणार्‍या सेवा कोलमडल्या आहेत. 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत जिल्ह्यात सहाशेवर कर्मचारी कार्यरत आहेत. यातील काही कर्मचारी हे दहा वर्षांपासून सेवेत आहेत. जिल्ह्यातील जिल्हा, तालुका, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी हे कर्मचारी कर्तव्यावर आहेत. आरोग्य सेविका, आरोग्य सहायक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, तालुका लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आदी कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करीत आहेत. कंत्राटी कर्मचार्‍यांना अल्प मानधन, त्यांच्यावर होणारे अन्याय, कार्यालयामध्ये मिळणारी दुय्यम दर्जाची वागणूक   या सर्व प्रकारामुळे कंत्राटी कर्मचारी अत्यंत निराश झालेला असल्याची जाणीव संघटेच्यावतीने प्रशासनाला देण्यात आली आहे.  समान काम, समान वेतन व शासकीय नोकरीमध्ये कायम करावे, ही त्यांची मुख्य मागणी आहे. हे कर्मचारी जिल्हा रुग्णालयापासून ग्रामीण पातळीपर्यंत काम करीत आहेत. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील 83 ठिकाणचे लसीकरण रद्द करण्यात आले आहे. 

एनआरएचएमचे कर्मचारी ग्रामीण भागात प्रसूती करण्याचे कामात महत्त्वाची भूमिका बजावतात. या आंदोलनामुळे या प्रसूती काही ठिकाणी रेफर करण्याची वेळ आली असल्याची माहिती आंदोलक विकास शिंदे यांनी दिली. शालेय आरोग्य तपासणीचे कामही हे कर्मचारी करतात. या आंदोलनामुळे ही शालेय आरोग्य तपासणीलाही ब्रेक लागले आहे. यासह गरोदर मातांची नोंदणी, मातृवंदना योजना यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशा ठिकाणी रुग्णांना मिळणार्‍या सेवा, सुश्रुशा अशा कामांवरही परिणाम झाला आहे.