Sun, Jul 21, 2019 16:12
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › पाणी आवर्तन काळ ११ दिवसांवर

पाणी आवर्तन काळ ११ दिवसांवर

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 07 2018 10:15PMमानवत :  मोहन बारहाते

पाणी पुरवठ्याच्या दोन आवर्तनातील काळ अकरा दिवसांवर गेल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. शिवाय पाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी पाणी पुरवठा विभागातील कर्मचार्‍यांवर नागरिकांचा दबाव वाढत आहे. पाणी कधी येणार? याची फोनवरून नागरिक माहिती विचारून कर्मचार्‍यांना भंडावून सोडत आहेत.

मागील दीड-दोन महिन्यांपासून झरी तलावावरील जनरेटरला डिझेल नाही. त्यातच विजेचा दाब कमी मिळत असल्याने विद्युतपंप बंद राहात आहेत. याचा परिणाम पाणी पुरवठ्याच्या दोन आवर्तनातील अंतर वाढण्यात होत आहे. आजमितीस अनेक भागांत दहा दिवस उलटूनही पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना डोळ्यात पाणी येईपर्यंत पाण्याची वाट पाहावी लागत आहे. पाणी अत्यावश्यक असल्यामुळे नागरिक पाण्यासाठी पाणी पुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना फोन करून नळाला पाणी कधी येणार? याची विचारणा करीत आहेत. नगरसेवकांना या असुविधेचा फटका बसत असल्याने त्यांनाही नागरिक पाण्याबाबत विचारणा करीत आहेत. त्यामुळे नगरसेवकांचे प्रतिनिधी जलकुंभावर जाऊन, पाण्याच्या स्थितीची चौकशी करून, तास दोन तास वेळ लागला तरी चालेल परंतु पाणी भरपूर सोडा अशी विनंती कर्मचार्‍यांना करीत आहेत. 

कधी पाईपलाईन फुटल्याने, कधी विद्युतपंप जळाल्याने, कधी विद्युतदाब कमी असल्याने तर कधी जनरेटरला डिझेल नसल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होतो. योग्य नियोजनाअभावी हे सगळे घडते आणि याचा त्रास मात्र नागरिकांना आणि विशेष म्हणजे महिला वर्गाला सहन करावा लागतो. मोलमजुरी करणार्‍यांची स्थिती तर आणखीच खराब आहे. विशेष म्हणजे मानवत नगर पालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी महिलाच विराजमान आहेत.