Thu, Jul 18, 2019 21:38होमपेज › Marathwada › रिमोटचा वापर करून वीज मीटर ऑन-ऑफ 

रिमोटचा वापर करून वीज मीटर ऑन-ऑफ 

Published On: Jul 02 2018 1:45AM | Last Updated: Jul 02 2018 1:45AMबीड : प्रतिनिधी 

वीज चोरीवर प्रतिबंध घालण्यात यावा यासाठी महावितरण कंपनीकडून वीज मीटर बदलण्यात येत आहेत, परंतु वीज चोरीचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. रिमोटद्वरे वीज मीटर ऑन-ऑफ  करून आपल्या सोयीनुसार त्याचा वापर करून 11 हजार 900 युनिटची वीज चोरी केल्याचा प्रकार परळीत घडला. महावितरण कंपनीच्या पथकाने तिघांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. 

बीड येथील वीज वितरण कंपनीच्या फिरत्या पथकाने परळी, अंबाजोगाई भागात वीज चोरी करणार्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. परळी येथील आझादनगर भागातील शेख सलाउद्दीन शेख मोईनोद्दीन या ग्राहकाने रिमोटद्वारे मीटर चालू बंद करून 8 हजार 424 इतक्या युनिटची वीज चोरी करून 1 लाख 67 हजार 580 रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता मधुकर साळवे यांच्या फिर्यादीवरुन ग्राहकाविरुद्ध अंबाजागाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई याच पथकाने परळीतील कृष्णनगर भागात केली.

मोहन मोरे या ग्राहकाने देखील रिमोटद्वारे मीटर चालू बंद करून 3131 इतक्या युनिटची वीज चोरी करून महावितरण कंपनीचे 30 हजार 840 रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी साळवे यांच्या फिर्यादीवरुन अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी कारवाई अंबाजोगाई येथील धोबीघाट परिसरात करण्यात आली. या ठिकाणी बडे नामक ग्राहकाने वीज कंपनीच्या लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून 350 युनिटची वीज चोरी केली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण तीन कारवाईमध्ये तब्बल 11 हजार 900 युनिटची वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.