Sat, Jul 20, 2019 14:58होमपेज › Marathwada › उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुक : न्यायालय निर्णयानंतर  मतमोजणीचा निर्णय 

उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुक : न्यायालय निर्णयानंतर  मतमोजणीचा निर्णय 

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 11 2018 12:49AMबीड : प्रतिनिधी 

न्यायालयीन प्रक्रियेमुळे 24 ‘मे’पासून उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर पडली आहे. या प्रकरणातील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात  सोमवारी होणार आहे. निकालाबाबतची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच मतमोजणीवर शिक्कामोर्तब होणार आहे. 

11 जून पर्यंत या निवडणुकच्या मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करा, अशी अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली होती. यातील साम्य म्हणजे, 11 जून रोजी, सोमवारीच या मतमोजणीवर उच्च न्यायालय निर्णय देणार आहे. त्यामुळे मोजणी होईल की पुन्हा पुढे ढकलली जाईल हे उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे. 

बीड नगरपालिकेच्या दहा नगरसेवकांना अपात्र केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. त्यानंतर त्यांना मताचा अधिकारही मिळाला, मात्र त्यांच मत हे बाजूला ठेवण्यात आल्याने परत ते नगरसेवक न्यायालयात गेले आणि त्यामुळेच ही मतमोजणीची प्रक्रिया लांबणीवर पडली. त्या नगरसेवकांंचे म्हणणे होते, की आमच मतदान बाजूला ठेवून मोजल गेले तर गोपनीयतेचा भंग होईल, दरम्यान येत्या 12 तारखेपर्यंत विधान परिषद सदस्यांची मुदत आहे. म्हणजे पहिल्या आमदाराचा कालावधी 12 तारखेला संपत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणार्‍या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक झाली. 24 मे रोजी सर्व निकाल जाहीर करण्यात आले, मात्र बीड-उस्मानाबाद-लातूरची मतमोजणीच झाली नाही. कारण, याबाबत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात विविध याचिका दाखल झाल्या आहेत.

बीडमध्ये प्रतिष्ठेची लढत

लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक चुरशीची मानली जात आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला.