Thu, Jul 18, 2019 10:48होमपेज › Marathwada › कापसावर सुरुवातीलाच  गुलाबी अळीचा प्रादुर्भाव    

कापसावर सुरुवातीलाच  गुलाबी अळीचा प्रादुर्भाव    

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 12:08AMपाथरी : प्रतिनिधी

सतत नैसर्गिक आणि आर्थिक अडचणींचा  सामना करत असलेल्या शेतकरी राजाने पेरणीची पूर्ण तयारी केली. यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने त्या ठिकाणच्या शेतकर्‍यांनी  नगदी पीक असलेल्या कापसाचीही लागवड केली.  पाथरी तालुक्यातील रेणापूर, बाबूलतार, काळे पिंपळगाव, पोहेटाकळी, देवनांद्रा, वडी शिवारात कापसाची पेरणी होऊन कापूस उगवला, परंतु त्यामध्ये काही ठिकाणी गुलाबी रंगाची अळी सुरुवातीलाच दिसत आहे. तसेच काही रोपांची पाने पिवळसर पडत आहेत तर काही पानांना हिरव्या रंगाच्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत असून यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सुरुवातीलाच हवालदिल झाले आहेत. 

 या अळीचे प्रमाण असेच राहिले तर येणार्‍या काळात कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावर्षी सुरुवातीला अनेक भागांत मृग नक्षत्र आणि त्यानंतर आता आर्द्रा नक्षत्रात खरिपाची पेरणी सुरू आहे. यावर्षी नेमके कोणते उत्पादन घ्यावे, या संभ्रमावस्थेत शेतकरी दिसून आले. मात्र अनेकांनी पुन्हा कापूस, सोयाबीन या पिकांना प्राधान्य देत लागवड आणि पेरणी उरकून घेतली आहे. त्यात रेणापूर तसेच काळे पिंपळगावच्या शिवारात तसेच बाजूच्या पाणी असलेल्या शिवारात पीक जोमाने उगवले असले तरी त्यावर रोगांचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. उगवलेल्या रोपांची पाने पिवळसर पडली आहेत तर काहींच्या खाली हिरव्या रंगाच्या आळ्या पाने खात असताना दिसत आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.