Thu, Apr 25, 2019 18:51होमपेज › Marathwada › जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य

Published On: Feb 07 2018 1:34AM | Last Updated: Feb 07 2018 12:32AMपरभणी : प्रतिनिधी 

जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क उघड्यावर लघुशंका, शौचास बसून  दुर्गंधी पसरविण्यात येत आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसराला उकिरड्याचे स्वरुप येण्यास सुरुवात झाली आहे, परंतु प्रशासनाकडून या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यात येत नसल्याने नागरिकांकडून खंत व्यक्‍त करण्यात येत आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तहसील व कोषागार कार्यालये आहेत. कोषागार कार्यालयाजवळ मुद्रांक विक्रेते बसतात. त्याच्या बाजूस मोकळे मैदान आहे. झाडे-झडुपे अन् जनावरांचा वावर असलेला हा परिसर नेहमीच अस्वच्छ असल्याने मुद्रांक विक्रेत्यांसह तेथे कामासाठी येणार्‍या सर्वसामान्यांना  दुर्गंधीचा सामना करावा लागतो. जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर मोठा असून जिल्हा प्रशासनाने कार्यालयातील सुविधांकडे लक्ष दिले, परंतु परिसराची स्वच्छता व संरक्षण वार्‍यावर सोडल्याचे  चित्र दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनी प्रशासनाने परिसराच्या स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केल्याने आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. दोन प्रवेशद्वार असलेल्या या कार्यालयात संरक्षणाच्या दृष्टीने चौकी बांधण्यात आलेली आहे. मात्र तेथे  अद्याप चौकीदार  नियुक्‍त नसल्याने परिसर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा अड्डा बनला आहे. परिसरातील आडोशाचा गैरफायदा घेऊन सायंकाळी सहाच्यानंतर या परिसरात मद्यसेवन करणार्‍यांचे टोळके बसत आहे. एवढेच नाही तर या परिसरात उघड्यावर शौचास बसून दुर्गंधी पसरविण्यात येत आहे. यामुळे येणार्‍या महिला व नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचार्‍यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या सर्व बाबींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे असे म्हणावे लागेल. कारण सर्व वरिष्ठ अधिकारी कार्यालयात प्रवेश करताना राजरोसपणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इज्जतीची लक्‍तरे वेशीवर टांगणार्‍या प्रकारांचे दर्शन घडविल्या जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियमित पोलीस संरक्षणही नाही अन् प्रशासनाने चौकीदारही नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात कोणतीही व्यक्‍ती मुक्‍तसंचार करु शकते. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची सुरक्षितता रामभरोसे असल्याची चर्चाही नागरिकांत आहे.