Thu, Apr 18, 2019 16:14होमपेज › Marathwada › बाळापूर शिवारात दुबार पेरणीचे संकट

बाळापूर शिवारात दुबार पेरणीचे संकट

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 11:17PMआखाडा बाळापूर : प्रतिनिधी

8 व 9 जून रोजी झालेल्या दमदार पाऊसामुळे कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली होती. काही शेतकर्‍यांनी सोयाबीनबरोबर हळदीची लागवड केली. परंतु मागील चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न पडल्यास शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट येणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
हवामान विभागाने पाऊस लवकर होण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने आखाडा बाळापूर परिसरात हजेरी लावली. सलग तीन दिवस पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांनी पेरण्या हाती घेतल्या. परिसरात जवळपास 30 ते 35 टक्के शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी पूर्ण केली.

तसेच बहुतांश हळद उत्पादक शेतकर्‍यांनी बेडवर हळदीची लागवडही केली. 10 जूनपासून पाऊस गायब झाल्याने शेतकर्‍यांची धाकधूक वाढली आहे. काही भागात सोयाबीनची उगवण होत आहे. परंतु तापमान 35 अंशांपेक्षा जास्त गेल्यामुळे अंकुर कोमेेजू लागले आहे. तर हळदीसाठी पाणी देणे आवश्यक ठरल्यामुळे सध्या शेतशिवारात ज्या शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी ठिबक व तुषारद्वारे पाणी देत आहे. महागामोलाचे बियाणे पेरून आभाळाकडे पाहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली असल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. दिवसभर कडाक्याची ऊन पडून कोरडी हवा वाहत असल्याने शेतशिवारात सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यातच हवामान विभागाने 22 जून पर्यंत पाऊस होणार नसल्याच अंदाज वर्तविल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. येत्या दोन दिवसांत पाऊस न झाल्यास पेरलेले बियाणे वाया जाऊन पुन्हा शेतकर्‍यांना दुबार पेरणी करण्याची वेळ येणार असल्याने शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.