Thu, Jul 18, 2019 00:33होमपेज › Marathwada › ‘रिलायन्स कंपनी, कृषी विभागाच्या चुकीमुळे पीक विमाच मिळाला नाही’

‘रिलायन्स कंपनी, कृषी विभागाच्या चुकीमुळे पीक विमाच मिळाला नाही’

Published On: Jun 27 2018 1:21AM | Last Updated: Jun 26 2018 9:33PMपरभणी : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या सोयाबीन पिकांची आणेवारी चुकीच्या पद्धतीने काढून लिमला मंडळातील हजारो शेतकर्‍यांना विम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. रिलायन्स कंपनी व कृषी अधिकार्‍यांच्या चुकीमुळे हे झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे शासनाने सोयाबीन पीकविम्याची रक्‍कम त्वरित वाटप करावी, यासाठी मंगळवार (दि. 26) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लिमला कृषी मंडळातील शेतकर्‍यांनी उपोषण सुरू केले आहे. 

केंद्र शासनाच्या विम्या संदर्भातील निकषाप्रमाणे मुख्य पिकासाठी विमा घटक म्हणून गाव किंवा मंडळ गृहीत धरणे बंधनकारक आहे, परंतु लिमला कृषी मंडळात 50 टक्के पेरा असणार्‍या सोयाबीनसाठी तालुका घटक गृहीत धरून कोट्यवधी रुपयांचा पीक विमा नाकारला गेला आहे. सोयाबीन पीक पूर्णतः गेले असल्याची वास्तविकता असतानादेखील आणेवारी काढण्याची चुकीची पद्धत वापरण्यात आली. लिमला महसूल मंडळात शासनाच्या कृषी विभागाने वास्तविक उत्पन्‍न 182 कि. ग्रॅ. प्रतिहेक्टर आहे. उंबरठा उत्पन्‍न 823 कि. ग्रॅम प्रतिहेक्टर असल्यामुळे 31554 रुपये प्रतिहेक्टर विमा देण्याऐवजी तालुक्याचे सरासरी उत्पन्‍न गृहीत धरून पीक विमा नाकारला आहे. यामुळे मंडळातील 7 हजार 7 शेतकर्‍यांची 18 कोटी रुपयांची फसवणूक रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने केली आहे. याच प्रकारे जिल्ह्यातील 37 मंडळांपैकी 18 मंडळांतील हजारो शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या उपोषणात पंतप्रधान पीक विमा संघर्ष समितीचे पदाधिकारी जि. प. सदस्य श्रीनिवास जोगदंड, भाजपचे जि. प. गटनेते डॉ.सुभाष कदम, कॉ. राजन क्षीरसागर, गजानन अंबोरे, पांडुरंग दुधाटे, रामकिशन दुधाटे, किशनराव दुधाटे, विश्‍वांभर गोरवे, माउली जोगदंड, तुकाराम दहे, पांडुरंग भोसले, रामेश्‍वर भोसले, गणेश काळे यांच्यासह  लिमला मंडळातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दरम्यान यावेळी आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी उपोषणास भेट देऊन अन्यायाचा  निषेध करून शेतकर्‍यांना त्वरित पीक विमा द्यावा, अशी मागणी केली.