होमपेज › Marathwada › दारूच्या नशेत पत्नीचा खून

दारूच्या नशेत पत्नीचा खून

Published On: Jul 05 2018 1:39AM | Last Updated: Jul 04 2018 10:56PMपरळी : प्रतिनिधी

घरगुती भांडणामुळे संतप्‍त झालेल्या दारुड्या पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः परळी ग्रामीण ठाण्यात दाखल होऊन पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. खुनाची घटना मंगळवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास परळी तालुक्यातील कौठाळी तांड्यावर घडली.

सुनीता हिचा सात वर्षांपूर्वी परळी तालुक्यातील कौठळी तांड्यावरील दिलीप किशन चव्हाण सोबत  विवाह झाला होता. या दाम्पत्याला तीन मुली होत्या त्यातील एक मुलगी मरण पावली होती. सध्या त्यांना चार वर्षांची एक व दोन वर्षांची एक अशा दोन मुली आहेत. दिलीप चव्हाणच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने हे दोघे व दिलीपचे आई-वडील ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. दिलीपला सुरुवाती पासून दारूचे व्यसन जडले होते. ऊसतोडीचे काम संपले की ट्रॅक्टर चालक म्हणूनही तो काम करत होता. मंगळवारी  सायंकाळी दिलीप चव्हाण दारूच्या नशेत घरी आला. त्याची सुनीताशी वादावादी झाली. त्यानंतर दोघांनी जेवण केले. रात्री 10:30 च्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. दिलीप याने रागाच्या भरात सुनीताचा गळा दाबून खून केला. यावेळी घराचे दरवाजे लावलेले होते. त्यानंतर त्याने शेजारी असलेल्यांना पत्नी मरण पावल्याचे सांगितले. तांड्यावरील नागरिकांनी या महिलेला परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. घटना घडल्या नंतर दिलीप पोलिसांसमोर हजर झाला.

दीपालीच्या आई-वडिलांना घटना घडल्या नंतर सहा तासांनी कळविण्यात आले. सकाळी दीपालीचे नातेवाईक सुरुवातीस कौठळी तांड्यावर व त्यानंतर परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात आले होते.  दीपालीचे वडील उद्धव दीपा राठोड यांच्या फिर्यादी वरून ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.