Mon, May 20, 2019 08:43होमपेज › Marathwada › फौजदाराचा रिव्हॉल्वर दाखवून बारमध्ये राडा

फौजदाराचा रिव्हॉल्वर दाखवून बारमध्ये राडा

Published On: Apr 28 2018 1:44AM | Last Updated: Apr 27 2018 11:33PMगेवराई : प्रतिनिधी

गेवराई पोलिस ठाण्यातील एका मद्यधुंद पोलिस उपनिरीक्षकाने पाथर्डीत राडा केला. दारूच्या नशेत तर्राट झालेल्या या पोलिस उपनिरीक्षकाने  रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मालक, वेटर, ग्राहक आणि सोडवायला आलेल्या स्थानिक पीएसआयलाही मारहाण केली, मात्र यानंतर ग्राहकांनी व इतर काहींनी या मद्यधुंद पीएसआयला चांगलाच चोप दिला.  ही घटना गुरुवारी रात्री 8 वा. दरम्यान पाथर्डी-शेवगाव रोडवरील मधुबन हॉटेलमध्ये घडली.  

गेवराई पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल तानाजी मालुसरे हे पाथर्डी तालुक्यातील तारखेश्वर गडावरील यात्रा बंदोबस्तासाठी तैनात होते.  गुरुवारी गेवराईकडे परतत असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडलगत असलेल्या पाथर्डी येथील मधुबन हॉटेलमध्ये गेले. त्याठिकाणी त्यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 19 बिअरच्या बाटल्या रिचवल्या. रात्री सात ते आठ वाजण्याच्या सुमारास पोटात गेलेल्या दारूने झिंग चांगलीच चढवली. आपण ड्युटीवर आहोत, आपलं कोणीच काही करू शकत नाही, असे म्हणत हॉटेलमध्ये असलेल्या वेटरपासून येणार्‍या ग्राहकांना   मारण्यास सुरुवात केली.

खासगी चारचाकी वाहनामध्ये वर्दी काढून ठेवलेल्या या पोलिस उपनिरीक्षकाने हॉटेलमधील फर्निचर, टेबल, खुर्च्या  यांची मोडतोड करायला सुरुवात केली. याच दरम्यान एक तरुण हॉटेलमध्ये जेवणासाठी आला, त्यालाही मारहाण करायला सुरुवात केली, मात्र त्या तरुणाने आपल्या सहकार्‍यांना घटनास्थळी बोलवले.  पोलिसाचा हा गोंधळ पाहून आणि शिवीगाळ ऐकून उपस्थितांनी मालुसरेंना  चोप दिला. यावर मालुसरेने आपल्या कमरेला असलेली पिस्तूल बाहेर काढली आणि ती उपस्थित लोकांसह हॉटेल मालकावर तानून धरली.  हॉटेलमालक मल्हारी सिरसाट यांनी पाथर्डी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले, मात्र अमोल मालुसरेने पोलिस कर्मचार्‍यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्यानंतर उपस्थित पोलिसांनी या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. पोलिस उपनिरीक्षक वैभव पेठकर हे सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. मालुसरे यांना ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता तेव्हा मालुसरेने आपल्या हातातली रिव्हॉल्व्हर टेबलवर आपटली.  उपनिरीक्षक वैभव पेठकर यांच्यावर हात उचलला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या घटनेबाबत हॉटेल मालक मल्हारी सिरसट यांच्या फिर्यादीवरून  पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.